कुडाळ नगरपंचायतच्या बैल बाजार बसविण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हरकत

मनसेच्या निवेदनास मुख्याधिकारी यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या बैल बाजार बसविण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हरकत घेतली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी अरविंद नातू याना दिले आहे. मनसेच्या निवेदनास मुख्याधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या मासिक बैठकीत काही नगरसेवकांनी नगरपंचायत हद्दीत बैल बाजार बसविण्याचा ठरवा मांडला होता आणि नेमका यालाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेत निवेदनाच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री नातू यांना नगरपंचायत मार्फत बैल बाजार बसविल्यास नगरपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या जकात कराच्या पावतीचा दुरुपयोग होऊन अनधिकृत बैल वाहतुकीसाठी पावतीचा वापर केला जाऊ शकतो असे निदर्शनास आणून दिले. सदर बाब लक्षात आणून देताच तसेच उच्च न्यायालयाची सुद्धा गोवंश बाबत सक्त मनाई आदेश असल्याने मुख्याधिकारी नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपंचायत हद्दीमध्ये बैल बाजार बसवणार नसल्याची ग्वाही दिली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब, एसटी कामगार सेनेचे राज उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, जिल्हा सचिव बाळा पावसकर,उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, शाखाध्यक्ष सरंबळ सिताराम कदम आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.