भीमरत्न सहकारी संस्थेतील सव्वा कोटीच्या अपहारप्रकरणी संचालिकेला अटकपूर्व जामीन

संशयिताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांनी सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार व गैरवापर केल्याप्रकरणी संस्थेच्या सांगवे येथील संचालिका शुभांगी बाळकृष्ण कांबळे हिला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी १५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला. श्रीमती कांबळेच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
जिल्हा विशेष लेखा परीक्षण वर्ग १ चे लेखा परीक्षक प्रशांत दळवी यांनी भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे सन २००८ ते २०१५ या मुदतीतील संस्थेच्या व्यवहारांची तपासणी केली. यावेळी शासनाने संस्थेला दिलेल्या रकमेपैकी ९८ लाख ९६ हजार ६४० रकमेचा व सभासदांकडून भांडवल म्हणून जमा केलेल्या २३ लाख ७० हजार मिळून १ कोटी २२ लाख ६६ हजार रकमेचा अपहार व गैरवापर केल्याप्रकरणी अध्यक्षा प्राजक्ता कदम यांच्यासह सचिव प्रशांत शिंदे व दहा संचालकांविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी संचालिका शुभांगी कांबळे (शुभांगी उमतोल, सध्या रा. भिवंडी, ठाणे) हिच्यावतीने दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने १५ हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना तपासिक अधिकारी बोलावतील त्यावळी सहकार्य करणे, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ न करणे अशा अटी घातल्या आहेत.
कणकवली, प्रतिनिधी





