जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू
तहसीलदार कार्यालयात गेले दोन दिवस सुट्टी दिवशी विशेष शोध मोहीम
कणकवलीत काही “कुणबी” नोंदी आढळल्याची तहसीलदारांची माहिती
मराठा आरक्षणासाठी उपोषण करत सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्यानंतर असा सरकार ऍक्टिव्ह मोडवर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कुणबी मराठा, कुणबी, मराठा कुणबी या नोंदि शोधण्यासाठी महसूल विभाग कामाला लागला आहे. शनिवारपासून कणकवली तालुक्यातील जुन्या जन्म- मृत्यू रजिस्टर वरील मोडी लिपी व मराठीतील नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे हे स्वतः या कामावर लक्ष ठेव असून, तहसीलदारांसोबत निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे यादेखील या नोंदीच्या तपासणी मोहिमेत सक्रिय आहेत. एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना देखील दुसरीकडे तहसीलदार कार्यालयात शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी दिवशी हे काम सुरू आहे.
या शोध मोहिमेदरम्यान मोडी लिपी जाणकार देखील या कामा मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहेत. जेणेकरून काही नोंदी या मोडी लिपीमध्ये असल्याने या नोंदीची योग्य माहिती व्हावी या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत तपासणी केलेल्या रेकॉर्डमध्ये कणकवली तालुक्यातील काही कुणबी अशा नोंदी आढळल्या आहेत. अशी माहिती श्री. देशपांडे यांनी दिली. या नोंदींचा शोध घेत असताना 1967 पूर्वीच्या व त्यानंतरच्या देखील नोंदींचा शोध घेत हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. गेले दोन दिवस हे काम करत असताना तहसीलदार दीक्षांत देशपांडे हे स्वतः या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. व शक्यतो लवकर हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिगंबर वालावलकर /कणकवली