नवीन कुर्ली साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी मानले प्रशासनाचे आभार

फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर झाले आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुकीत नविन कुर्ली मधील सुमारे 143 मतदारांना हक्काच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. नविन कुर्लीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, प्रशासक सूर्यकांत वारंग यांचे आभार मानले आहेत. स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर झाल्यामुळे आता फोंडाघाट अथवा लोरे येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी जाण्याची गरज नसून मतदारांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर झाल्यामुळे कुर्ली गावातील तसेच नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेल्या प्रकल्पग्रस्त कुर्ली वासीयांनी आपली नावनोंदणी नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत च्या मतदारयादीत करून घ्यावी असे आवाहनही अनंत पिळणकर यांनी केले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!