दिक्षा पार्क जानवली येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिक्षा पार्क जानवली येथे स्त्रियांच्या आरोग्यावर मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर नुकतेच पार पडले.कणकवली येथील गुरुकृपा हॉस्पिटलच्या डॉक्टर सौ शमीका बिरमोळे यांनी याप्रसंगी स्त्रियांना स्त्रियांचे विविध आजार व उपचार यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित स्त्रियांची स्तनांच्या कर्करोगाची पूर्वनिदान शारीरिक तपासणी करून त्यांना कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप सुद्धा त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थिती स्त्री – पुरुषांची मधुमेह तपासणी व रक्तदाब तपासणी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. याचा दिक्षा पार्क येथील सुमारे 60 मुली,स्त्रिया व पुरुषांनी लाभ घेतला. त्याचप्रमाणे यावेळी कणकवली तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने उपस्थितांना आभा कार्ड व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स कार्ड देण्यात आली.याप्रसंगी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ आयनोडकर,आरोग्य सेविका गीता शिरकर, दिक्षा पार्कचे विकासक सुधीर जाधव,माजी सैनिक दत्तगुरु गावकर, ज्येष्ठ नागरिक सिद्धार्थ कदम, उपराजिता राऊत आदी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी दत्तगुरु गावकर, गीता शिरकर, सागर चव्हाण, विजय सातपुते, रामदास कापसे, नागेंद्र मेस्त्री,सुधीर साटम यांनी परिश्रम घेतले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण