आचरा रोडवर कणकवली हद्दीत मच्छी विक्रेते रस्त्यालगत ठाण मांडून

कणकवली नगरपंचायत प्रशासनाची डोळेझाक
मुख्याधिकारी प्रभारी, कर्मचारी सुशेगात
कलमठ ग्रामपंचायत कारवाई करते मग कणकवली नगरपंचायत चा दुर्लक्ष का?
कणकवली शहरात मच्छी मार्केट असताना तसेच शहरालगत कलमठ मध्ये येथे देखील मच्छी मार्केट असून सुद्धा कणकवली आचरा रोडवर कणकवली हद्दीत खुलेआम मच्छी विक्रेते ठाण मांडून रस्त्या लगत बसत असल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कणकवली नगरपंचायत चे होत असलेले दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत असून, कणकवली नगरपंचायत कडून याकडे डोळेझाक केली जात असल्याने सर्वसामान्य जनतेला व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे आचरा रोडवर नेहमीच वाहतूक कोंडी असताना खुलेआम बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना आता कोण आवरणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेकदा या मच्छीविक्रेत्यांमुळे थांबलेली वाहने व नागरिक यांच्या गर्दीमुळे अपघातही घडत असतात. कणकवलीचे प्रभारी मुख्याधिकारी हे प्रभारी असल्याने त्यांच्याकडून याबाबतही कोणती कार्यवाही केली गेली नाही. मंगळवार, बुधवार, रविवार अशा वारांना मच्छी विक्रेते खुलेआम रस्त्या लगत बसत असताना कलमठ ग्रामपंचायतने सातत्याने कारवाईचा बडगा उगारल्या नंतर या हद्दीत बसण्याऐवजी मच्छी विक्रेते बिनधास्तपणे कणकवली हद्दीत बसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास कणकवली मुख्याधिकारी दूर करणार का? असाच सवाल उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली