सिंधुदुर्गात पुरेसा सीएनजी गॅस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करा!

कणकवलीतील रिक्षा व्यवसायिक संघटनेची आमदार नितेश राणे यांच्याकडे मागणी
कणकवली शहरांमधील बहुतांश व्यावसायिकांच्या रिक्षा या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. मात्र कणकवली तालुक्यातील सर्व रिक्षा व्यावसायिकांना ओरोस व फोंडाघाट येथील केवळ दोनच सीएनजी पंप स्टेशनवर अवलंबून राहावे लागते. आणि या दोन्ही सीएनजी पंप स्टेशनवर कधीच पुरेसा सीएनजी उपलब्ध नसतो. काही वेळा बारा बारा तासाहून अधिक वेळ रांगेत राहूनही सीएनजी उपलब्ध होत नाही.
आमच्यापैकी अनेक रिक्षा व्यावसायिकांनी कर्ज काढून रिक्षा घेतली आहे. या व्यवसायावरच आमच्या कुटुंबाची गुजरान होते. मात्र सीएनजीसाठी अनेक तास रांगेत राहावे लागते, त्यामुळे त्याचा व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे. तर पंप स्टेशनवर सीएनजी नसल्यास रिक्षा व्यवसाय बंद ठेवावा लागतो.
तरी आपणास विनंती आहे की,
ओरोस व फोंडाघाट येथे सीएनजी पंप स्टेशनवर पुरेशा प्रमाणात सीएनजी उपलब्ध होण्यासाठी आपल्या मार्फत प्रयत्न व्हावेत. अशी मागणी कणकवलीतील रिक्षा व्यवसायिक संघटनेने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे, कणकवली आणि परिसरात नव्याने सीएनजी पंप स्टेशन उभारण्यात यावेत. रिक्षा व्यावसायिकांसाठी सीएनजी भरण्यासाठी स्वतंत्र रांग ठेवावी.
सध्या पेट्रोलचे दर वाढलेले असल्याने रिक्षा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अवघड जात आहे. तरी सीएनजी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करून आम्हा रिक्षा व्यावसायिकांना व आमच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासह अन्य रिक्षा चालक, मालक यांनी केली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली