वैभववाडी महाविद्यालयात हिंदी दिन संपन्न

वैभववाडी – महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभाग आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या संयुक्त विद्यमाने १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे,कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ कोकण ग्रामीण बँक रत्नागिरीचे क्षेत्रीय प्रबंधक श्री.बी.पी.सामंत, जिल्हा अग्रणी बँक सिंधुदुर्गचे प्रबंधक श्री. मुकेश मेश्राम, विदर्भ कोकण ग्रामीण बँक भुईबावडा येथील शाखाधिकारी श्री.प्रसाद धुरी, उपप्राचार्य प्रा.डॉ. एम.आय.कुंभार, हिंदी विभाग प्रमुख प्रा.ए.एम.कांबळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘वित्तीय और डिजिटल साक्षरता एक विचारमंथन ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे बी.पी.सामंत यांनी आजचे युग हे डिजिटल युग आहे. डिजिटल साक्षरतेचे महत्त्व सांगून बँकेतील डिजिटल कामकाजाची माहिती दिली. डिजिटल साक्षरता या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. डिजिटल साक्षरतेचे महत्त्व उदाहरणासह पटवून दिले. मुकेश मेश्राम यांनी संवादामध्ये भाषेचे महत्त्व सांगत असताना बँकेमध्ये भाषेचे स्थान याबाबतचे विवेचन आपल्या भाषणात केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एस.काकडे यांनी हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा देऊन हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.शरदचंद्र रावराणे यांनी भाषेच्या मधुरतेबाबत विचार व्यक्त करून हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कु.तन्वी पवार, मनस्वी शिंदे आणि रितेश शिवगण या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. हिंदी दिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘हिंदी निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम कु.अश्विनी संतोष पांचाळ, द्वितीय कु. रेणुका सुरेश नागप, तृतीय कु. सलोनी संतोष पवार, उत्तेजनार्थ कु.प्रज्ञा मंगेश कोलते, कु. तेजस्वी सुरेश रहाटे, कु. दीपा दिनेश तेली या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए.एम.कांबळे यांनी केले. आभार डॉ. डी.वाय. लंगडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन.ए.कारेकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!