कुडाळ मध्ये उद्या ‘पुरूषोत्तम’ची प्राथमिक फेरी

सिंधुदुर्गातील फक्त तीन कॉलेज सहभागी
स्पर्धा सिंधुदुर्गात असूनही जिल्ह्यातल्या महाविद्यालयांची उदासिनता
निलेश जोशी । सिंधुदुर्ग : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अत्यंत मानाची समजली जाणारी महाराष्ट्र कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा यावर्षी कुडाळ येथे होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्या ठीक सकाळी ठीक ९ वाजता कुडाळच्या संत राऊळ महाराज कॉलेजमध्येसुप्रसिध्द अभिनेत्री वर्षा वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धा सिंधुदुर्गात होऊन सुद्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांनी मनाच्या अशा या स्पर्धत सहभागी होण्यात मात्र रस दाखवलेला नाही. .
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी दरवर्षी रत्नागिरी येथे होते. या केंद्रावर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश असतो. या वर्षी ही फेरी दोन टप्प्यात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी कुडाळ येथे शुक्रवार दि. ०१ सप्टेंबर रोजी तर रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी शनिवार दि. ०२ सप्टेंबर रोजी चिपळूण येथे ही स्पर्धा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन व रत्नागिरी जिल्ह्यातील आठ अशी एकूण अकरा महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. या अकरा महाविद्यालयातुन प्रथम, द्वितीय, तृतीय व सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका अशा चार एकांकिका पुणे येथील महाअंतिम फेरीसाठी निवडल्या जातील. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात तर चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही स्पर्धा संपन्न होईल.
या प्राथमिक फेरीचे उद्घाटन कुडाळ येथे तर पारितोषिक वितरण चिपळूण येथे होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. ०१ सप्टेंबर रोजी सकाळी ठिक ९.०० वाजता सुप्रसिध्द अभिनेत्री वर्षा वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर सकाळी १०.०० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ निर्मित मुक्ती, सकाळी ११.१५ वाजता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ओरोस निर्मित धयकालो व दुपारी १२.३० वाजता स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड निर्मित वनपिस या एकांकिका सादर होणार आहेत. रसिकांनी या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील महाविद्यालयांची उदासीनता
दरवषी हि स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर होते. तिथे जाण्या येण्याचा आणि एकांकिका सादर करण्यात कलाकारांना विविध अडचणी असायच्या. तरी देखील कॉलेजेस या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायची. या स्पर्धक महाविद्यलयाना जवळचे केंद्र असावे यासाठी हि स्पर्धा सिंधुदुर्गात व्हावी म्हणून काही नाट्यकर्मीनी फार प्रयत्न केले. त्यामुळे यंदा या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल असे वाटले होते. पण केवळ तीन महाविद्यलये या मानाच्या स्पर्धेत सिंधुदुर्गातून सहभागी झाली आहेत.
निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग. .