रखडकेला तोंडवळी सुरुबन रस्ता मार्गी लावा

तळाशील गावात येण्यासाठी असलेल्या सुरुबन रस्ता पुरता बिकट बनला असल्यामुळे तळाशीलवासीय पुरता त्रासला असून आपण जर आमच्या मच्छिमार बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण आला असाल तर सर्वात आधी आमच्या मूलभूत व पायाभूत सुविधा पूर्ण करा अशी मागणी तळाशिलात दाखल झालेल्या सागरी यात्रेतील ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याकडे तळाशील ग्रामस्थांनी केली.
आचरा येथून सुरु झालेली सागरी यात्रा तळाशील येथील मच्छिमार बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळाशिलात सायंकाळी दाखल झाली होती यावेळी श्रीकुष्ण मंदिरात ग्रामस्थ यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीला ब्रिगेडियर सुधीर सावंत ,सागर यात्रा संयोजक उल्हास तांडेल, बबन शिंदे जिल्हा सचिव किसन मांजरेकर, तालुका प्रमुख महेश राणे, राजा गावकर, विश्वास गांवकर, मच्छिमार नेते दिलिप घारे, निलम शिंदे,योगेश तुळसकर,शिरसाट, जयहरी कोचरेकर संजय केळुसकर तळाशील येथील मच्छिमार बांधव,पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते.

वनविभागाच्या जाचक अटींमुळे गेली 30 वर्षे दुरुस्तीपासून दूर राहिलेल्या सुरूबन रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. शासन दरबारी ग्रामस्थांनी अनेकवेळा उंबरठे झिजवून त्यांच्या पदरी निराशा आली आहे. रस्त्याबाबत बोलताना तळाशील मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर म्हणाले की तोंडवळी सुरूबनचा रस्ता व्हावा, यासाठी १९९२ पासूनच लोकांची मागणी जोर धरू लागली होती. त्यातूनच तोंडवळी – तळाशिल ग्रामस्थांनी रस्ता आंदोलन कृती समिती स्थापन करून लढा सुरू ठेवला होता. त्यासाठी त्यावेळी मुंबई, नागपूर, भोपाळ येथील सरकारी कार्यालयांचा हुंबरटा झिजवावा लागला होता. त्यावेळचे तत्कालीन आमदार कै. आब गोगटे यांनी प्रयत्न केले होत. मात्र, खऱ्या अर्थाने तत्कालीन वनमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात या प्रयत्नांना यश मिळून २००० साली तोंडवळी सुरूबनचा कच्चा मातीचा रस्ता झाला मात्र आता 23 वर्षे उलटली रस्त्याचे कोणतेही काम झाले नाही राजकारण्यांची आश्वासने फोलच 23 वर्षे उलटूनही तोंडवळी सुरूबन रस्ता डांबरीकरण होऊ शकत नाही. वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या या दिड किमी रस्त्याची साधी डागडुजी होणेही मुश्कील बनले आहे. १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनांना रस्ता खराब असल्याने अर्धातास घालावा लागत आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे हा त्रास केव्हा संपणार, असा सवाल त्यांनी या बैठकीत केला.
या भागात डिसेंबर अखेर पिण्याचे पाणी खारे होत आहे त्यासाठी पाणीपुरवठा करणारी सक्षम नळपाणी योजना होणे आवश्यक आहे. नदी आणि समुद्र अशा दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर धूप होत असून वेळेत बंधारे होणे गरजेचे आहे. पर्यटन वाढत असलेल्या तळाशींलात सातत्याने कमी दाबाचा विजपुरवठा होत असून नव्याने योग्य क्षमतेचे ट्रानफॉर्मर बसवणे आवश्यक आहेत. आपण सागरी यात्रेच्या निमित्ताने या सर्व मूलभूत पायाभूत गरजा पूर्ण करून आम्हाला द्याव्यात अशी मागणी माजी सरपंच संजय केळुस्कर यांनी केली. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी ग्रामस्थांनी सुचवलेली आतापर्यंत अपूर्ण विकासकामे मार्गी लावणार असल्याचे आश्वस्थ केले.

आचरा प्रतिनिधी

error: Content is protected !!