जीवन आनंद संस्थेकडून सोमेश्वर या निराधार व्यक्तीस आधार
कुडाळ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून संविता आश्रमात सोमेश्वर केले दाखल
पणदूर : जीवन आनंद संस्थेच्या मु.पणदूर ता.कुडाळ येथील संविता आश्रमात सोमेश्वर (वय अंदाजे ५० ते ५२) या निराधार व्यक्तीस कुडाळ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून दाखल करण्यात आले.
सोमेश्वर हे निराधार व्यक्ती कुडाळ पणदूर वेताळ बांबर्डे या दरम्यान पायी चालत असलेले दै. तरूण भारत चे पत्रकार अरूण अणावकर यांनी पाहिले.व याबाबतची माहिती जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांना दिली….संदिप यांनी सदर गृहस्थास कुडाळ पोलिस स्टेशन मार्फत संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल केले आहे.यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत हे त्यांचे समवेत होते.
सोमेश्वर या व्यक्तीची चौकशी केली असता ते फारसे बोलू शकत नसल्याचे समजले. त्यामुळे या व्यक्ती बाबत अधिक माहिती अद्याप समजलेली नाही.
मात्र अंशतः संवादा वरून ही व्यक्ती दक्षिण भारतीय असल्याचे समजते.जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधारांसाठी काम करीत असून सोमेश्वर यांच्या प्रमाणेच मानसिक रूग्णावस्थेत अनेक निराधार व्यक्ती पोलिसांमार्फत आणि समाजातील संवेदनशील नागरिकांमार्फत आश्रमात दाखल होतअसतात. निराधार व्यक्ती आश्रमातील उपचाराने ब-या झाल्यानंतर हळूहळू त्यांचेशी संवाद सुरू होतो. एकदा का अशा माणसांचे गाव-तालुका-जिल्या समजला की आश्रमातील कार्यकर्ते गुगल-फेसबुक-व्हाट्स अँपसारख्या समाज माध्यमांचा उपयोग करून अशा निराधार,मनोरूग्ण व वाट चुकलेल्या व्यक्तींचा ठाव ठिकाणा शोधून त्यांचे कुटुंबात पुनर्मिलन करण्यासाठी कार्य करतात.
वर्षोनवर्षे निराधार वंचित जिवन जगलेल्या…आणि नंतर आश्रमात येवून बरे झालेल्या ३०० हून अधिक व्यक्तींना संस्थेने देशभरातील विविध राज्यांतील त्यांचे कूटुंबात दाखल करण्यासाठी आजवर आवाश्यक संयोजन केले आहे.
किसन चौरे
विश्वस्त
जीवन आनंद संस्था