… आणि वृद्धाचा जीव वाचला !
विलास कुडाळकर, तहसीलदार, न प. प्रशासन, पोलीस यांची तत्परता
प्रतिनिधी । कुडाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वृद्ध व्यक्ती अडकल्याची माहिती कुडाळ नगरपंचायतीचे भाजपा नगरसेवक विलास कुडाळकर यांनी तहसीलदार अमोल पाठक यांना दिली त्यांनी तात्काळ पोलीस, कुडाळ नगरपंचायत अधिकारी यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन पोलीस व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने या वृद्ध व्यक्तीला पाण्याबाहेर काढले. आणि त्या वृद्ध व्यक्तीचा जीव वाचविला.
कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. अनेक नागरिक स्थलांतरित झाले रात्रौ उशिरापर्यंत पाणी वाढत होते दरम्यान डॉ. आंबेडकर नगर मधील स्मशानभूमीमध्ये राहणारा वृद्ध व्यक्ती पाण्यामध्ये अडकल्याबाबत आनंद रेसिडेन्सीमध्ये राहणारे संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक चौगुले यांनी डॉ. आंबेडकर नगर मधील संत राऊळ महाराज महाविद्यालयाला कामाला असलेले प्रवीण जाधव यांना संपर्क साधला. हा संपर्क साधल्यानंतर प्रवीण जाधव यांनी स्थानिक नगरसेवक व भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांना संपर्क साधून त्या वृद्धाला पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
तहसीलदार व पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये पुराच्या पाण्याचा वेढा वाढला होता रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता पुराचे पाणी सिद्धिविनायक हॉलपर्यंत आले होते. नगरसेवक विलास कुडाळकर यांनी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांना संपर्क साधला असता सिद्धिविनायक हॉल येथे त्यांच्या समवेत पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच पोलीस कर्मचारी संजय कदम, रुपेश सारंग, नॅथन हिप्परकर, फ्रिडण बिथेलो, प्रतिभा सामंत, होमगार्ड विल्सन, शंकर घाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नागरिक सुधीर कुडाळकर, नितेश कुडाळकर, प्रथमेश कुडाळकर, यशवंत कुडाळकर, रुपेश कुडाळकर, संदेश मालवणकर, हर्षल मालवणकर, किरण कुडाळकर, सुजय जाधव, विशाल जाधव आदी दाखल झाले.
आणि त्या वृद्धाला पाण्यातून सुखरूप काढले बाहेर
सिद्धिविनायक हॉल ते स्मशानभूमीपर्यंतचा पाण्याने भरलेला मार्ग तब्बल ५०० मीटरचा होता. या पाण्यातून मार्ग काढून त्या वृद्ध व्यक्तीला बाहेर काढायचे होते. पोलीस कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक नागरिक सुधीर कुडाळकर हे पाण्यातून मार्ग काढून स्मशानभूमीपर्यंत गेले. त्या ठिकाणी असलेल्या नवनाथ मंदिराजवळ हा वृद्ध व्यक्ती पाण्यामध्ये होता त्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. आणि त्याची राहण्याची सोय जवळ असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आली. इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक कांबळे यांनी सहकार्य केले.
बिबवणे, पिंगुळी येथील २० जणांना पोलिसांनी काढले बाहेर
कुडाळ तालुक्यातील बिबवणे व पिंगुळी येथे पुराच्या पाण्यामध्ये नागरिक अडकले होते. कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या भागातील २० जणांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक ग्रामस्थांमधून होत आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.