मंत्रिमंडळ विस्तार । दादांच्या ९ मंत्र्यांना वजनदार खाती

अजित पवारांना अर्थ, धनंजय मुंडेंना कृषी तर वळसे पाटलांना सहकार,
ब्युरो । मुंबई : पक्षनेतृत्वाशी विरोधी भूमिका घेऊन अजित पवार यांनी वेगळी चूल मांडत आगामी काळात भाजपशी संसार करण्याचं ठरवलं आणि २ जुलै रोजी शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर आणखीही ८ मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. शपथ घेऊन १२ दिवस उलटले तरी खातेवाटपाचं कोडं काही सुटत नव्हतं. अखेर आज खातेवाटपाला मुहूर्त मिळाला आहे. अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना सगळी वजनदार खाती मिळालेली आहेत.
शिंदे गटातील मंत्री आमदारांच्या विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलेलं आहे. तर दिलीप वळसे पाटील यांना महत्त्वाचं मानलं जाणारं सहकार खाते देण्यात आलेले आहे. दुसरीकडे मराठवाड्याच्या अब्दुल सत्तार याच्याकडे असलेलं कृषी खातं काढून घेऊन ते फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलंय. तर आदिती तटकरे यांना अपेक्षेप्रमाणे महिला आणि बालकल्याण खाते मिळालेले आहे.
अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचा समावेश सरकारमध्ये झाला असला, तरी या विस्ताराला दोन आठवडे उलटूनही नव्या मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नव्हते. महत्त्वाच्या खात्यांसह पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्ष सुरू होता. त्यामुळे खातेवाटपाला विलंब होत होता. मात्र एकनाथ शिंदे-अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर खातेवाटपाचा तिढा सुटला.
पहा कोणाला कोणती मिळाली खाती
श्री. एकनाथ संभाजी शिंदे. मुख्यमंत्री यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल,, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.
श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, उप मुख्यमंत्री यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार
श्री. अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री यांच्याकडे वित्त व नियोजन
श्री. छगन चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
श्री. दिलीपराव दत्तात्राय वळसे-पाटील यांच्याकडे सहकार
श्री. राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील यांच्याकडे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास
श्री. सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय
श्री. हसन मिय्यालाल मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य
श्री. चंद्रकांत (दादा) बच्चु पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्राद्योग, संसदीय कार्य
श्री. विजयकुमार कृष्णराव गावित यांच्याकडे आदिवासी विकास
श्री. गिरीश दत्तात्रय महाजन यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत
श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता
श्री. दादाजी दगडू भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
श्री. संजय दुलीचंद राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण
श्री. धनंजय पंडीतराव मुंडे यांच्याकडे कृषी
श्री. सुरेश (भाऊ) दगडू खाडे यांच्याकडे कामगार
श्री. संदीपानराव आसाराम भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना, फलोत्पादन
श्री. उदय रविंद्र सामंत यांच्याकडे उद्योग
श्री. तानाजी जयवंत सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
श्री. रविंद्र दत्तात्राय चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
श्री. अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक विकास व ओकाफ, पणन
श्री. दिपक वसंतराव केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण, मराठी भाषा
श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन
श्री. अतुल मोरेश्वर सावे यांच्याकडे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण
श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास
श्री. संजय बाबुराव बनसोडे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
श्री. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
श्री. अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
यांची खाती बदलली.
अब्दुल सत्तार – कृषी खाते काढून- अल्पसंख्याक विकास
संजय राठोड- अन्न आणि औषध प्रशासन काढून मृदा आणि जलसंधारण
अतुल सावे- सहकार खाते काढून – ओबीसी कल्याण
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई.