सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली एक्साइजची मळगाव येथे कारवाई
सावंतवाडी
इन्सुली उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयित वाहनाचा थरारक पाठलाग करुन गोवा बनावटीच्या दारुसह एकूण १३ लाख २९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील महिंद्रा स्कॉर्पिओ (जीजे-१-आरवाय १४३) ही गाडी जप्त करण्यात आली. अंधाराचा फायदा घेत चालक पलायन करण्यात यशस्वी झाला.याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून बेकायदा दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली इन्सुली एक्साइजला मिळाली होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोव्यातून येणाऱ्या संशयित गाडीला इन्सुली येथील नाक्यावर तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करण्यात आला. मात्र चालकाने सुसाट गाडी नेण्याचा प्रयत्न केला. एक्साइजच्या कर्मचार्यांनी गाडीचा पाठलाग करुन मळगाव पुलावर अडविले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चालकाने पलायन केले.
कारमध्ये मॅकडॉल नं.१ व्हिस्कीचे ३७ बॉक्स याची किंमत ३ लाख १९ हजार ६८० रुपये आहे. तसेच १० लाखांची स्कॉर्पिओ गाडीही जप्त करण्यात आली.ही कारवाई प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दीपक वायदंडे, रणजित शिंदे यांनी केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करत आहेत.