पाऊस अंदमानत आला तरी हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीत येईना!

धरणाचे पाणी सोडल्याचे दावे पाऊस पडेपर्यंत तरी पुरे होणार का?
नदीपात्रे कोरडी, नदीलगतच्या नळ योजना देखील बंद होण्याची भीती
हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याची मागणी गेले काही दिवस सातत्याने होत असताना अद्याप पर्यंत जानवली नदीपात्रात हे पाणी पोहोचलेले नाही.याबाबत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांची भेट घेत लक्ष घेतले होते. तहसीलदार आर जे पवार यांनी देखील नदीपात्रात पाणी सोडले असल्याची माहिती श्री. मेस्त्री यांना पंधरा दिवसापूर्वी दिली होती. तर याबाबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्याशी संपर्क साधला असता हरकुळ धरणाचे पाणी चार दिवसांपूर्वी सोडले असल्याचे चार दिवसांपूर्वी सांगितले. परंतु या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सांगण्यामध्ये दिवसांवर दिवसाच्या फेऱ्यांमध्ये निदान पावसाळा सुरू होईपर्यंत तरी जानवली नदी पत्रात पाणी येउन त्याचा फायदा लोकांना होईल का? असा प्रश्न आता जानवली नदीकाठच्या गावातील लोकांना पडला आहे. कारण अधिकाऱ्यांमधून कागदी घोडे नाचवण्याकडे अधिक भर दिला जात असल्याचेही या निमित्ताने पाहायला मिळत आहे. जानवली नदीपात्रालगत अनेक गावांच्या नळ योजना आहेत. तसेच या नदीपात्रात पाणी सोडल्यास गावानजीच्या जलस्त्रोतांच्या पाणीसाठयात देखील वाढ होते. व त्याचा फायदा नागरिकांना होतो. यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळता येते. असे असताना याबाबत वारंवार मागणी करूनही कोणती ही सकारात्मक भूमिका ठोसपणे घेतलेली पाहायला मिळत नाही. कारण जून महिना जवळ आला मान्सून अंदमानत पोहोचला. येत्या काही दिवसात मान्सून कोकणात सक्रिय होईल असे हवामान खात्याने संकेत दिले असताना मान्सून अंदमानात येऊन देखील हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात पोहोचत नसल्याने या मागची नेमकी कारणे काय? की पाणीटंचाई चे गांभीर्य न घेताच केवळ उंटावरून शेळ्या हाकवण्याचे प्रकार सुरू आहेत. असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. जानवली नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे हे कोरडे पडलेले नदीपात्र भरण्याकरिता व ते पाणी जानवली, कलमठ व वरवडे पर्यंत पोहोचण्याकरिता किमान अजून आठ ते दहा दिवस जाण्याची शक्यता आहे. असे असताना जर अजून जानवली नदी पात्राला मिळणारी हरकुळ वरून येणारी नदी भरली नसेल व ही नदी भरण्याकरता जर तलावाचे पाणी या नदीत आले नसेल तर हे पाणी कलमठ पर्यंत पोहोचायला किमान अजून आठ ते दहा दिवस जाण्याची शक्यता आहे . त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांकडून उत्तरे देण्याकडे कोणतेही काम होत नसल्याने नदीपात्रालगत गावांमधून जनतेची नाराजी वाढली आहे. पाणीटंचाई सारख्या गंभीर समस्येकडे होत असलेला दुर्लक्ष हा कितपत योग्य असा देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली