को. रे.आरक्षणातील घोटाळ्या संदर्भात खासदार विनायक राऊत यांची एमडी सोबत चर्चा

तुतारी एक्सप्रेस ला नांदगाव स्टेशनवर थांबा देण्या बाबत एमडी सकारात्मक

युवासेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे यांची माहिती

कोकण रेल्वे मध्ये तिकीट आरक्षण घोटाळा झाला असून, गणेश चतुर्थीच्या सर्व रेल्वेचे काही सेकंदात आरक्षण फुल झाले आहे. त्यामुळे चाकरमान्यांवर अन्याय होत असून, या साऱ्यावर उपाय म्हणून दलालांना पायबंद घालणे, प्रवाशांना होणारा त्रास थांबवणे, आगामी गणेश उत्सवासाठी या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या मागणीसह कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला पुन्हा थांबा मिळावा यासाठी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती युवा सेनेचे विभाग प्रमुख सिद्धेश राणे यांनी दिली. या भेटीदरम्यान उपनेते, कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. नांदगाव रेल्वे स्थानकातून फोंडाघाट, नांदगाव, कासार्डे या गावांच्या दशक्रोशीसह देवगड, विजयदुर्ग व घाटमाथ्यावरील राधानगरी भागातील प्रवासी प्रवास करतात. या स्थानकावर नियमित फक्त दिवा सावंतवाडी पॅसेंजर थांबते. या स्थानकावर सुरवातीपासून थांबणारी गाडी नंबर ११००३/११००४ अप डाऊन दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस कोरोना काळात बंद करण्यात आली होती. ती अद्याप थांबा दिलेला नाही. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे व दशक्रोशीतील रेल्वे प्रवासी ग्रामस्थांनी यापूर्वी खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी पुन्हा नव्याने खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मागणी केली असता संजय गुप्ता यांनी नांदगाव रोड रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेस ला थांबा देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी दिली.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!