ठाणे शहरातील तलावांचा ऐतिहासिक वारसा जपणारे ” मुक्काम पोस्ट तलाव” या नूतन बांदेकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन
‘तलावांचे शहर ठाणे’ अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील आजमितीस जिवंत असलेल्या बेचाळीस तलावांची रंजक सफर घडविणारे लेखिका सौ. नूतन बांदेकर, ठाणे यांचे ‘मुक्काम पोस्ट तलाव’ या पुस्तकाचे नुकतेच मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आले. ठाणे शहराला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. साधारणपणे ९ व्या शतकात शिलाहार काळातील बिंबराजाने भौगोलिक दृष्ट्या सुरक्षित आणि सुसंपन्न असे ठाणे शहर आपली राजधानी म्हणून निवडले. त्याच काळात प्रत्येक पाखाडी मध्ये एक एक शिवमंदिर आणि जवळच मोठमोठे तलाव खोदले. नंतर काळाच्या ओघात त्यातील अनेक तलाव नामशेष झाले. आज अनेक तलाव मरणासन्न अवस्थेत पोहोचलेले आहेत. मुळात शिक्षिका आणि पर्यावरण प्रेमी असलेल्या नूतन बांदेकर यांनी खूप मेहनत घेऊन आजपर्यंत जिवंत असलेल्या सर्व तलावांना भेटी देऊन त्यांची प्रत्यक्ष परिस्थिती, त्यांचा वैभवशाली इतिहास आणि दीनवाणे भविष्य यावर अभ्यासपूर्ण लेखन केलेले अतिशय सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक तलावाचे फोटोग्राफ्स आणि संपूर्ण माहिती वाचताना वाचकांना या तलावांची सफर घडते. अशा प्रकारे तलावांविषयी पहिल्यांदाच पुस्तक लिहिले गेले असल्याने त्याचे जोरदार स्वागत होत आहे.