पॅलेस पॉलिटिक्स यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही ! : केसरकर
तुमच्याबद्दल आदर, आता बोललात तर …
केसरकरांचा ठाकरेंना इशारा
प्रतिनिधी । कुडाळ : जोडे पुसून घेणे हे सरंजामशाहीचे लक्षण आहे. पॅलेस पॉलिटिक्स यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही. हे उद्धव ठाकरे यांनी नीट लक्षात घ्यावे असा सल्ला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिला आहे. दरम्यान, तुमच्याबद्दल आदर असून जनतेला भडकविण्याचे काम बंद करावे, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी नमूद केले. ते आज कुडाळ येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात उपस्थितीत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना केसरकर यांनी उत्तरे दिली.
ज्यांची जोडे पुसायची लायकी नाही ते सरकार चालवत आहेत, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर केली होती. त्यावर पत्रकारांनी केसरकर यांना विचारले असता त्यांनी यापुढे महाराष्ट्रात पॅलेस पॉलिटिक्स चालणार नाही. हे त्यांनी लक्षात घ्यावे असे स्पष्ट केले.
यावेळी केसरकर म्हणाले की, तुम्ही पत्रकार परिषद घेतली तर मी त्याला वेळाेवेळी उत्तर देईन. तुम्ही लोकांना किती भडकवले, कितीही रिफायनरी प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या जनतेला मलाही सांगाव्ह लागेल.
बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जाऊ नका
आपल्या विरोधात गेले की ते थांबवायचे आणि आंदोलन घडवून आणायची आणि मग त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची याच्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. कारण महाराष्ट्राचा विचार करणे हे बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला शिकवले. त्या विचारापासून लांब जाऊ नका अशा शब्दात मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत चुकलेच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका दिवसात जेवढे काम करतात तेवढे काम संजय राऊत यांनी एक महिन्यात करून दाखवावे असे आव्हान मंत्री केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे. केवळ ऑफिसमध्ये बसून काम होत नाहीत. संजय राऊत हे एक संपादक आहेत. ते बोलताना चुकले आहेत.
थोडे तरी कौतुक करा
एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल दिल्लीपर्यंत घेतली जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांचे थोडे तरी कौतुक करा असा सल्ला केसरकर यांनी संजय राऊत यांना दिला. संजय राऊत यांनी विरोधी पक्ष कधी सुट्टीवर जात नाही असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले होते. त्यावर केसरकर यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ