कचरा प्रश्नाचे राजकीय भांडवल करू नका; तो सोडवण्यासाठी एकजुटीने काम करा!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
एमआयडीसीतील कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरच मार्गी लागणार
शहरातील कचऱ्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, वर्षभरापूर्वी कुडाळ नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर या कामाला अधिक गती मिळाली आहे. त्यामुळे कचऱ्याच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करण्याऐवजी तो कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेनेचे कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
कुडाळ शहरातील कचरा डेपोच्या प्रश्नावरून जनआंदोलनाच्या माध्यमातून जनतेला भडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रश्न प्रत्यक्षात सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे. कचऱ्याचा प्रश्न हा आताच निर्माण झालेला नसून, अनेक वर्षांपासून शहराला भेडसावणारी ही समस्या आहे. आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत कचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न सुरू केले. नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एमआयडीसी परिसरात कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते प्रकल्पासाठी आवश्यक यंत्रसामग्रीच्या कामापर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे, असे गावडे यांनी म्हटले आहे.
कुडाळ शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. कचरा प्रश्नावर आंदोलन करणारे नागरिकही याच शहराचे रहिवासी आहेत. त्यामुळे आंदोलनापुरते मर्यादित न राहता, हा प्रश्न कायमस्वरूपी कसा सुटेल, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कचरा डेपो बंद करून किंवा कामात अडथळे निर्माण करून प्रश्न सुटणार नाही. उलट, त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे, असे आवाहनही अभिषेक गावडे यांनी केले.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात प्रश्न का सुटला नाही?
कुडाळ नगरपंचायतीवर सुरुवातीच्या तीन वर्षांत महाविकास आघाडीची, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता होती. त्या काळातही संबंधित पक्षांचे मंत्री, खासदार आणि आमदार सत्तेत होते. मात्र, त्यावेळी कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न का सोडवण्यात आला नाही? एमआयडीसीमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही ठोस कार्यवाही का झाली नाही, असा सवाल अभिषेक गावडे यांनी उपस्थित केला.
आता या प्रश्नावरून राजकीय भांडवल करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजकारण बाजूला ठेवून शहराच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ एमआयडीसीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम येत्या दोन महिन्यांत मार्गी लागेल, असा विश्वास अभिषेक गावडे यांनी व्यक्त केला आहे.






