पाट हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अभिनय, नृत्याचे मार्गदर्शन

पाट हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच विविध कलाविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने छंद वर्गाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यालयाच्या कलादालनात विद्यार्थ्यांसाठी नृत्य व अभिनय मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या विशेष मार्गदर्शन वर्गात नृत्य व अभिनयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अभिनयासाठी विशाल सांगळे व सिद्धार्थ कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर नृत्याचे मार्गदर्शन स्नेहांकित पारकर व भार्गवी राणे यांनी केले.
अभिनयाच्या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रसंग देऊन त्यांच्याकडून अभिनय करून घेण्यात आला. साईल सातर्डेकर, आयुष राऊळ, हर्षद परब, यथार्थ काणेकर व आरव आईर या विद्यार्थ्यांनी विविध प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण करत नाट्यप्रयोगात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच संस्थेच्या प्रतिनिधींनी कौतुक केले.

error: Content is protected !!