कणकवली तालुक्यातील काही ग्रामसेवकांची मनमानी थांबवा अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवू

ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळाचा गटविकास अधिकाऱ्यांना इशारा
अनेक मुद्द्यांबाबत विचारला जाब
कणकवली तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांची मनमानी कारभार सुरू असून हा कारभार थांबला नाही व बेकायदेशीर कामांना पाठीशी घेतले गेले तर या विरोधात ठाकरे शिवसेनेमार्फत आंदोलन कणकवली तालुक्यात केले जाईल असा इशारा ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू राठोड यांच्यासह शिष्टमंडळाने गटविकास अधिकाऱ्यांना दिला. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी ज्या संदर्भातील तक्रारी असतील त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी आश्वासन दिले. कणकवली तालुक्यातील काही ग्रामपंचायती व ग्रामसेवकांच्या कारभाराच्या विरोधात ठाकरे शिवसेनेने आज कणकवली पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांना भेटून जाब विचारला. करूळ ग्रामपंचायत मध्ये पाण्याची अनधिकृत टाकी हटविण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नाही. ओसरगाव ग्रामपंचायत मध्ये दोन ग्रामपंचायत सदस्य गेली नऊ महिने मासिक सभांना अनुपस्थित असताना देखील या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली गेली नाही. तर काही ग्रामपंचायतींमध्ये मासिक बैठकीपूर्वी मागील बैठकांची इतिवृत्त देण्याबाबत सदस्यांनी मागणी करून देखील त्याबाबतची कार्यवाही ग्रामसेवकांकडून केली जात नाही. या संदर्भात गटविकास अधिकारी म्हणून आपण तातडीने कार्यवाही करा तसे आदेश ग्रामसेवकांना द्या. अन्यथा या साऱ्यांच्या विरोधात आंदोलन छेडून शिवसेना स्टाईल दाखवली जाईल असा इशारा देखील दिल्याची माहिती श्री राठोड यांनी दिली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे विभाग प्रमुख विभाग प्रमुख विलास घोडेकर बबली राणी रवींद्र खंदारे सिद्धेश राणे, ओमप्रकाश ताम्हानेकर , बाळा राऊत, तात्या निकम, गुरू पेडणेकर आदी उपस्थित होते.






