भजन क्षेत्रातील जिवंत स्वर हरपला!बुवा समीर कदम यांच्या निधनाने भजनविश्वावर शोककळा.

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…!

कणकवली | मयूर ठाकूर कोकणच्या भजन क्षेत्रामध्ये आपल्या मधुर,भावस्पर्शी आणि दमदार गायनाने वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे अकाली निधन झाले.त्यांच्या निधनाच्या वार्तेने संपूर्ण कोकणासह महाराष्ट्रातील भजन रसिक,भजनी कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून,“कोकणातील एक जिवंत स्वर हरपला”अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.गोड गळ्याचे भजनी बुवा म्हणून समीर कदम यांनी भजन क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.मुंबई, कोकणासह महाराष्ट्राच्या विविध भागांत त्यांच्या गायनाचा मोठा चाहता वर्ग आहे.अत्यंत गोड,सुरेल आणि भावपूर्ण आवाजाबरोबरच डबलबारी भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.चित्रपटातील गाणी हुबेहूब सादर करण्याच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलेमुळेही त्यांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.अनेक नामवंत भजन सम्राट आणि भजनी बुवांसोबत त्यांच्या डबलबारी भजनाच्या मैफली रंगल्या.समीर कदम बुवा कार्यक्रमात असतील,तर रसिकांची गर्दी ओसंडून वाहणार,हे त्यांच्या लोकप्रियतेचे समीकरण बनले होते.
मूळ पोखरण गावचे सुपुत्र असलेल्या समीर कदम यांनी श्री.लिंगरवळनाथ प्रासादिक भजन मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागांत भजनसेवा केली.आपल्या कलेच्या बळावर त्यांनी प्रसिद्धीची मोठी उंची गाठली आणि अल्पावधीतच ते भजन क्षेत्रातील सर्वांचे लाडके,लोकप्रिय आणि रसिकांच्या हृदयातील ‘भजनरत्न’ बनले.
त्यांच्या अकाली निधनाने भजन क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी सहजासहजी भरून निघणारी नाही.विशेषतः तरुण वयातच असे गुणी आणि लोकप्रिय कलाकार काळाच्या पडद्याआड जाणे,ही बाब भजन क्षेत्रासाठी अत्यंत वेदनादायी आहे.“बुवा समीर कदम यांच्यासारखा गायक पुन्हा होणे नाही,” अशी भावना अनेक भजन रसिकांकडून व्यक्त होत आहे.

तरुण कलाकारांनी आरोग्याची काळजी घेत भजनसेवा करावी — बुवा श्री.संतोष कानडे. समीर कदम बुवा यांच्या निधनाबद्दल भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्गचे संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.तरुण वयात एखाद्या गुणी कलाकाराचे जाणे ही संपूर्ण भजन क्षेत्रासाठी मोठी हानी असल्याचे सांगत,प्रत्येक भजनी कलाकाराने आपल्या आरोग्याची काळजी घेणे,शरीराकडे दुर्लक्ष न करणे आणि कुठेही आहारी न जाता निरोगी आयुष्य जगत भजनसेवा करणे गरजेचे आहे,असा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश त्यांनी दिला आहे.
भजन ही केवळ कला नसून समाजाला दिशा देणारी आणि संस्कार घडविणारी सेवा आहे.त्यामुळे कलाकारांनी आपल्या लोकप्रियतेसोबतच आपल्या आरोग्याची आणि आयुष्याचीही जपणूक करावी,असे आवाहन संतोष कानडे यांनी केले आहे.

समीर कदम बुवा यांच्या स्वरांची मैफल थांबली असली,तरी त्यांनी आपल्या सुरांनी जिंकलेली रसिकांची मने सदैव त्यांच्या स्मृती जिवंत ठेवतील.बुवा शरीराने नसले तरीही त्यांचा लोकप्रिय “आवाज”कायम अजरामर राहील हे निश्चित.

भजनी कलाकार संस्था,सिंधुदुर्गचे संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि भजनी कलाकारांच्या वतीने समीर कदम बुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली…ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कदम कुटुंबीयांना तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

error: Content is protected !!