‘आदि अनंत’ चित्रपटातून कुडाळचा बालकलाकार आरव आईर मोठ्या पडद्यावर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत वैशिष्ट्यपूर्ण भूमिका
१२ नोव्हेंबरला महाराष्ट्रभर चित्रपट प्रदर्शित
कुडाळच्या कलाक्षेत्रातील उदयोन्मुख बालकलाकार आरव सुरेश आईर याला ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत आरव महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, येत्या १२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आरवच्या या यशामुळे कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून, दिग्दर्शनाची धुरा महेश लिमये यांनी सांभाळली आहे. आजोबा आणि नातू यांच्यातील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक नातेसंबंधांची हृदयस्पर्शी गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटात अशोक सराफ, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, वैदेही परशुरामी, कविता लाड, श्रीरंग गोडबोले आणि गीतकार गुरु ठाकूर यांच्यासह अनेक कलाकार भूमिका साकारत आहेत. या दिग्गज कलाकारांसोबत आरवला अभिनयाची संधी मिळाली आहे.
पिंगुळी येथील उत्कर्षनगरचा रहिवासी असलेला आरव सध्या कुडाळ हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकत आहे. अवघ्या ११व्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स २०२४’ या रिअॅलिटी शोमध्ये तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. तसेच झी चित्र गौरव सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत अभिनय करण्याची संधीही त्याला मिळाली.
‘मुंजा’, ‘सोरट’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांसह सन मराठीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेत आरवने काम केले आहे. या मालिकेतील ‘दिघ्या’ या भूमिकेमुळे तो विशेष लक्षात राहिला. ‘विण दोघातली ही तुटेना’ या मालिकेच्या गणपती विशेष भागात त्याने ‘गणू’ची भूमिका साकारली. याशिवाय ‘अंधारमाया’, ‘अथांग’ आणि ‘कल्की’ या वेबसीरिज, विविध लघुपट आणि व्हिडिओ अल्बममधूनही त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
नाट्यक्षेत्रातही आरवने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ‘धीम टॅंक डिटॅंग’ या एकांकिकेतील ‘गोपी’च्या भूमिकेसाठी त्याला अटल करंडक एकांकिका स्पर्धा २०२३ मध्ये उत्कृष्ट बालकलाकार प्रथम पुरस्कार मिळाला. अहमदनगर करंडक स्पर्धेत लक्षवेधी बालकलाकार पुरस्कार, तर ‘सिंड्रेला’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. ‘केकी’ या लघुपटासाठीही त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळवला आहे. याशिवाय विविध राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नृत्य व अभिनय स्पर्धांमध्ये त्याने पारितोषिके पटकावली आहेत.
बालवयातच चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि रंगभूमी अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या आरवसाठी ‘आदि अनंत’ हा चित्रपट महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ज्येष्ठ कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या या कुडाळच्या बालकलाकाराच्या पुढील वाटचालीबद्दल उत्सुकता व्यक्त होत असून, त्याच्या यशामुळे स्थानिक कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.






