भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

कुडाळ हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा
अनुष्का परब प्रथम, कोमल प्रभू द्वितीय
भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे आणि विद्यार्थिदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज येथे आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘भ्रष्टाचार एक सामाजिक समस्या’ हा स्पर्धेचा विषय होता.
भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित या स्पर्धेला कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक वराटे, उपमुख्याध्यापक रंजन तेली व नारायण साळवी, शिक्षक गोविंद पवार आणि साळवी यांचे सहकार्य लाभले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील, पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पोलीस निरीक्षक दीपक माळी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत अनुष्का संतप्रसाद परब हिने प्रथम, कोमल विनोद प्रभू हिने द्वितीय, तर लावण्या प्रशांत मेस्त्री हिने तृतीय क्रमांक पटकावला. सांगवी पांडुरंग सरमळकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना बक्षिसे आणि प्रावीण्य प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यंदा २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ‘सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे’ ही या सप्ताहाची संकल्पना आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि देशाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, सत्यनिष्ठा जपावी आणि भ्रष्टाचारासंदर्भात निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करण्यासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२२२८९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९९२२८९१०६४ यावर संपर्क साधावा, असेही विभागाने कळविले आहे.






