‘शेअरिंग इज केअरिंग’ भावनेतून पालक व शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधा !

न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांचे आवाहन
कुडाळमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’चा शुभारंभ
विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी आल्यानंतर किंवा शाळेत असताना आपल्या पालकांशी आणि शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे ही काळाची गरज आहे. ‘शेअरिंग इज केअरिंग’ या भावनेतून मुलांनी आपल्या आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव पालक आणि शिक्षकांशी शेअर केल्यास अनेक अडचणींवर वेळीच उपाययोजना करता येऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला घाबरून न जाता मुलांनी आपल्या अडचणी विश्वासाने सांगाव्यात, असे आवाहन कुडाळचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी. ए. कुलकर्णी यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सुरक्षित बचपन अभियान’चा शुभारंभ २३ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील बॅ. नाथ पै हायस्कूलमध्ये करण्यात आला. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ (POCSO Act) या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कुडाळ तालुक्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचे उद्घाटन न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शक ॲड. तृप्ती प्रभुदेसाई, पोलीस उपनिरीक्षक सचिन अवताडे, पोलीस हवालदार जी. जी. गोसावी, आर. डी. गुरव, बॅ. नाथ पै हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. सी. राठोड आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना ॲड. तृप्ती प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगितला. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याबरोबरच कोणत्याही अनुचित प्रसंगाबाबत पालक आणि शिक्षकांशी मोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
पोलीस उपनिरीक्षक सचिन अवताडे यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रसंगाला न घाबरता सामोरे जावे, तसेच आपल्यासोबत काही अनपेक्षित किंवा अनुचित घटना घडल्यास ती बाब पालकांपासून अथवा शिक्षकांपासून लपवू नये, असे सांगितले. कोणत्याही अडचणीच्या वेळी विद्यार्थ्यांनी पालक, शिक्षक किंवा बाल हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. पोलीस हवालदार जी. जी. गोसावी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका बार असोसिएशन, कुडाळ आणि बॅ. नाथ पै हायस्कूल यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक प्रवीण सुर्वे यांनी केले. अभियानाच्या आयोजनासाठी सहायक अधीक्षक (प्रशासन) एस. डब्ल्यू. पई, वरिष्ठ लिपिक के. टी. कदम आणि शिपाई जे. के. चव्हाण यांनी सहकार्य केले.






