कुडाळ पोलीस ठाण्यात सायबर जनजागृती टेन्टचे उद्घाटन

ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी नागरिकांना मिळणार मार्गदर्शन

अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या हस्ते उद्घाटन

ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, यूपीआय व्यवहारांतील फसवणूक आणि डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्यात सायबर जनजागृती टेन्ट उभारण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२६ रोजी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कुडाळ पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीदरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला. डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना सायबर गुन्हेगारांकडून विविध मार्गांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, फसवणुकीच्या विविध पद्धती, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि सायबर गुन्ह्याला बळी पडल्यास करावयाची तातडीची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा टेन्ट उभारण्यात आला आहे.
मोबाईल बँकिंग, ऑनलाइन खरेदी, यूपीआय व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे तसेच अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करणे टाळावे, याबाबत या उपक्रमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. नागरिकांनी सायबर जनजागृती टेन्टला भेट देऊन सायबर सुरक्षेविषयी माहिती घ्यावी आणि ती आपल्या कुटुंबीयांपर्यंत व परिचितांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तातडीने तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.
या उद्घाटनप्रसंगी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ‘सावध नागरिक, सुरक्षित डिजिटल व्यवहार’ या संदेशातून सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढवून सुरक्षित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.

error: Content is protected !!