संत राऊळ महाराज महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षणाच्या नव्या संधी
येथील संत राऊळ महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला कुडाळमध्ये उच्च माध्यमिक शिक्षणापुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. बारावीनंतर पदवी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सावंतवाडी किंवा वेंगुर्ला येथे जावे लागत होते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेत २५ जून १९८४ रोजी पिंगुळी येथील संत परमपूज्य राऊळ महाराज यांच्या नावाने कुडाळमध्ये परमपूज्य राऊळ महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. पुढे या महाविद्यालयाचे नामकरण संत राऊळ महाराज महाविद्यालय असे करण्यात आले.
विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर उच्च शिक्षणाच्या अधिक संधी मिळाव्यात, यासाठी १९९६ मध्ये विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. त्यानंतर २००२ पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांना सुरुवात झाली. आज महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान यांसह संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन अभ्यासक्रम, अकाउंटिंग अँड फायनान्स अशा विविध शाखांमधील पदवी शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच रसायनशास्त्र, गणित, प्राणिशास्त्र, संगणकशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय आहे.
उच्चविद्याविभूषित प्राध्यापकवर्ग, शिस्तबद्ध वातावरण, सुसज्ज वर्गखोल्या आणि आधुनिक प्रयोगशाळा यांच्या बळावर महाविद्यालयाने जिल्ह्यात अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. २०१० मध्ये महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला होता. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) या क्षेत्रांतही महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणारे हे एकमेव महाविद्यालय असल्याचेही सांगण्यात आले.
स्वायत्ततेमुळे अभ्यासक्रमांमध्ये अधिक लवचिकता
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी स्वायत्त महाविद्यालयाबाबत माहिती दिली. स्वायत्त महाविद्यालय म्हणून विद्यापीठाशी संलग्नता कायम ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार अभ्यासक्रमांची रचना, अध्यापन पद्धती, परीक्षा आणि मूल्यमापन यांबाबत महाविद्यालयाला आवश्यक शैक्षणिक स्वातंत्र्य मिळते. या स्वायत्ततेच्या माध्यमातून स्थानिक गरजा, विद्यार्थ्यांची क्षमता आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन कौशल्याधारित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विकसित करता येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कृषी, पर्यावरण संवर्धन, डिजिटल तंत्रज्ञान आणि ग्रामीण उद्योजकता या क्षेत्रांशी संबंधित अभ्यासक्रम व संशोधनाला चालना देण्याची संधीही महाविद्यालयाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संशोधन आणि नवोपक्रम यांवर भर देत जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात योगदान देण्याचा संस्थेचा मानस आहे.
महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळवून देण्यासाठी संस्थेचे सहकार्यवाह महेंद्र गवस यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले. स्वायत्ततेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्यवसायाभिमुख शिक्षण उपलब्ध करून देऊन नव्या पिढीला सक्षम बनविण्यावर संस्थेचा भर राहणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल करावे, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी केले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांच्यासह अरविंद शिरसाट, अनंत वैद्य, का. आ. सामंत, महेंद्र गवस, डी. एस. पाटील, राजू परब, शिवाजी घोगळे, श्री. साईल, डॉ. रवींद्र जोशी, केदार सामंत, गजानन कांदळगावकर, सागर तेली, प्रतिभा पाटणकर आदी उपस्थित होते.
यावेळी संशोधनासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नानासाहेब कांबळे आणि डॉ. योगेश कोळी यांचा कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवीण सावंत याने महाविद्यालयातूनच पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याची माहिती प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी दिली.






