‘हिंदू वैश्य’ नोंदीला ओबीसी मान्यता

वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा

जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांची पत्रकार परिषद

वैश्य वाणी समाजातील बांधवांच्या जुन्या कागदपत्रांवर ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असल्याने ओबीसी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) मिळविताना येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा इतर मागास प्रवर्गात स्पष्टपणे समावेश करून आदेश जारी केल्याने वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाजाचे अध्यक्ष सुनील भोगटे यांनी राज्य शासनासह संबंधित लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुनील भोगटे यांनी या निर्णयाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्षा सुचित्रा भोगटे, पतसंस्थेचे संचालक ॲड. समीर वंजारी, उमेश वाळके, विजय भोगटे आदी उपस्थित होते.
वैश्य वाणी समाजाला ओबीसी प्रवर्गातून वगळण्यात आल्यानंतर २००८ पासून समाजाच्या प्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन समाजकल्याण मंत्री श्री.मोघे आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याने मंत्रालयात बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणी करून अहवाल दाखल केल्यानंतर २०११ च्या शासन निर्णयात अनुक्रमांक १९० वर ‘हिंदू वाणी’ आणि ‘हिंदू वैश्यवाणी’ यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला.
मात्र, ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा स्पष्ट उल्लेख राहून गेल्याने समाजातील अनेक बांधवांच्या कागदपत्रांवर असलेल्या या नोंदीमुळे जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळविताना अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः शाळेचे दाखले, जन्मनोंदी तसेच जमिनीच्या कागदपत्रांमध्ये ‘वैश्य’ किंवा ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असलेल्या बांधवांना याचा फटका बसत होता.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात समाजकल्याण मंत्री अतुल सावे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, आमदार अमल महाडिक, रत्नागिरीचे विकास शेट्ये, लांजाचे प्रसन्न शेट्ये तसेच सिंधुदुर्गातून सुनील भोगटे, ॲड. समीर वंजारी आणि उमेश वाळके उपस्थित होते.शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने शासन निर्णय काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या दहा दिवसांत ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा समावेश करून शासनाने स्पष्ट आदेश जारी केल्याचे भोगटे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे ‘हिंदू वाणी’, ‘हिंदू वैश्य’ आणि ‘हिंदू वैश्यवाणी’ या नोंदी असलेल्या तसेच १९६७ पूर्वीचा पुरावा जोडणाऱ्या समाजबांधवांना ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. याचा फायदा शैक्षणिक प्रवेश, शासकीय नोकरी तसेच राजकीय आरक्षणासाठी होणार असल्याचे भोगटे यांनी स्पष्ट केले.या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत, समाजकल्याण मंत्री अतुल सावे, आमदार प्रमोद जठार यांच्यासह यापूर्वी समाजाच्या मागणीसाठी सहकार्य करणारे तत्कालीन केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि राजन तेली यांचे जाहीर आभार मानले. यावेळी ऍड. समीर वंजारे यांनी देखील या सर्वांचे आभार मानताना सुनील भोगटे यांच्या योगदानाचा देखील आदराने उल्लेख करत त्यांचे देखील आभार मानले.

error: Content is protected !!