रस्त्याच्या डागडुजी चे आश्वासन मिळाले व ओसरगाव ग्रामस्थांनी थेट ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला

ठाकरे सेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडून गणेश चतुर्थी पूर्वी रस्त्याची ग्वाही
लोकप्रतिनिधींची आंदोलनाकडे पाठ झाल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप
ओसरगाव येथील परबवाडी अपराधवाडी परिसरातील रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून ओसरगाव येथे उपोषण आंदोलन छेडले. अनेक वर्षे मागणी करूनही रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या आंदोलनादरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिवसभर आंदोलनस्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला.
गेली दहा ते बारा वर्षे रस्त्याचा प्रश्न कायम असून, विकासाच्या केवळ घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात गावातील मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कणकवली विधानसभा मतदारसंघात गेली बारा वर्षे नितेश राणे आमदार असून, सध्या ते पालकमंत्रीही आहेत. गावागावांत रस्ते आणि विकासकामे केल्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी ओसरगावसारख्या गावात अनेक वर्षे रस्ता प्रलंबित राहणे ही परिस्थिती गंभीर असल्याचे सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.
भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवरही टीका
ओसरगावमध्ये सरपंच, उपसरपंच तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील लोकप्रतिनिधी भाजपशी संबंधित असतानाही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. जर स्थानिक पातळीपासून सत्तेपर्यंत सर्व ठिकाणी सत्ता असूनही मूलभूत रस्त्याचा प्रश्न सोडविता येत नसेल, तर या लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
‘आम्हीच निवडून दिले, आता चूक झाल्यासारखे वाटते’
परबवाडी व अपराधवाडी परिसरातील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण काही प्रमाणात झाले होते. मात्र विविध कारणांमुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा सरपंचांसह संबंधितांकडे रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला. सरपंचांनी निवडून आल्यानंतर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
‘आम्हीच त्यांना निवडून दिले, मात्र आता आमच्याकडून चूक झाल्यासारखे वाटत आहे,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने ग्रामस्थांचा उद्रेक
रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ दिवसभर उपोषणाला बसले असताना भाजपचे स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आंदोलनस्थळी फिरकले नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांची भूमिका जाणून घेतली.
यावेळी ग्रामस्थांनी वैभव नाईक व सुशांत नाईक यांच्यावर विश्वास व्यक्त केला. रस्त्याचे तात्पुरत्या कच्च्या स्वरूपात काम करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर भाजपला धक्का देत अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
‘गणपतीपूर्वी रस्त्याची डागडुजी करू’
“बेधडक आश्वासने देऊन कामे न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धक्का बसला पाहिजे. ओसरगाव परबवाडी येथील ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी उभे राहू. येत्या काळात गणपतीपूर्वी रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचे काम करण्यात येईल,” असे आश्वासन कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी पक्षप्रवेशावेळी दिले.
यावेळी कळसुली विभाग प्रमुख बबली राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला लोकप्रतिनिधींनी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्याव्यात, एवढीच ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र दिवसभर कोणत्याही लोकप्रतिनिधीने भेट न दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली, असे बबली राणे यांनी सांगितले.
३५ वर्षे राणे समर्थक; अखेर ठाकरे सेनेत प्रवेश
पक्षप्रवेशावेळी एका कार्यकर्त्याने गेली ३५ वर्षे राणे समर्थक म्हणून काम केले, मात्र गावातील विकासकामे आणि समस्या सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली.
“गेली ३५ वर्षे राणे समर्थक म्हणून राहिलो. मात्र आमच्या गावातील विकासाचा प्रश्न थांबला आहे. समस्यांबाबत अनेकदा तक्रारी करूनही काही कार्यकर्ते व पदाधिकारी दुर्लक्ष करतात. आमच्या मतदारसंघाकडे धुडकावूनही पाहिले जात नाही. त्यामुळे ठाकरे पक्षात प्रवेश करताना मनाला वाईट वाटत असले तरी आता कायमस्वरूपी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी राहणार,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश
कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत आणि कळसुली विभाग प्रमुख बबली राणे यांच्या नेतृत्वाखाली ओसरगाव येथील भाजप समर्थक व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
यामध्ये विशाल परब, विनोद परब, अमित अपराध, बाबू नालम, सखाराम परब, रोशन अपराध, रोशन तोरस्कर, अक्षय राणे, सर्वेश सावंत, अन्वी तोरस्कर, सुमन तोरस्कर, हर्षदा परब, सुलोचना तोरस्कर, सेजल तोरस्कर, स्वप्निल तोरस्कर, अक्षय तोरस्कर, संतोष परब, वैभव परब, सुचिता राणे, सत्यवती परब, योगिता सावंत, मीनाक्षी परब, मंदार परब आदींचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे ओसरगाव परिसरात भाजपला धक्का बसला असून, रस्त्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली नाराजी राजकीय वळण घेत असल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुका प्रमुख राजू राठोड, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, कळसुली विभाग प्रमुख बबली राणे, रुपेश आमडोसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी






