अपघात झाला, हात फ्रॅक्चर झाला व पोलीस म्हणतात तुम्ही त्या दूचाकीस्वाराला ठोकलं पाहिजे होतं

कणकवली पोलीस स्टेशनच्या एका पोलिसाच्या अजब सल्ल्याचा “विनोद” चर्चेत

कणकवली पोलीस निरीक्षक याप्रकरणी लक्ष देतील का?

कणकवली नरडवे रस्त्यावर रिक्षा व दुचाकी रेल्वे स्टेशनच्या दिशेने समांतर जात असताना दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अचानक आडवी दुचाकी घातली त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी रिक्षा त्यात स्थितीमध्ये बाजूला घेत असताना रिक्षा बाजूच्या खांबावर आदळून पलटी झाली. यात रीक्षेचेही नुकसान झाले. व रिक्षा चालकाचा देखील हात फ्रॅक्चर झाला. अपघातानंतर ते हुल देणारे दुचाकीस्वार तिथून पसार झाले. यानंतर रिक्षा चालकाने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर तिथे काही वेळानंतर आलेल्या पोलिसांना सदर ट्रिपल सीट असलेल्या दुचाकीस्वरांचा शोध घ्या अशी मागणी केली. मात्र यावर तिथे असणाऱ्या एका निवृत्तीच्या दिशेने झुकलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने “तुम्ही त्या दुचाकीस्वारांना ठोकलं असतं तर बरं झालं असतं” आता तुम्ही स्वतःहून अपघातग्रस्त झालात आता गुन्हा कुणावर होणार असा “विनोद” करणारा अजब सल्ला दिला. कणकवली पोलीस स्टेशनच्या त्या “विनोद” करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत यानिमित्ताने मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काल गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कणकवली नरडवे रस्त्यावर एका वेल्डिंग दुकानादरम्यान हा अपघात घडला. सदरचा अपघातग्रस्त रिक्षा चालक रेल्वे स्टेशनला रिक्षा भाडे आणण्यासाठी जात असताना याच दरम्यान त्या रिक्षा च्या सोबतच बाजूने ट्रिपल सीट असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांमधील दुचाकी चालवत असणाऱ्या एकाने चालू स्थितीमध्ये समांतर रिक्षा सोबत जात असताना डाव्या साईडला अचानक दुचाकी आणत हुल दिली अशी माहिती त्या रिक्षा चालकाने दिली. याच दरम्यान रीक्षेची आता यांना धडक बसणार म्हणून रिक्षा चालकाने रिक्षा डाव्या साईडला नेली. मात्र या दरम्यान रिक्षेची धडक बाजूला असलेल्या खांबाला बसून रिक्षा पलटी झाली. व यात रीक्षेचे नुकसान झाले . रिक्षा चालकाने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेला असता त्याच्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला सांगितले. त्यानंतर घटनेबाबत कणकवली पोलिसांना माहिती देत याबाबत संबंधित ट्रिपल सीट असणाऱ्या त्या दुचाकीचा शोध घ्या अशी मागणी त्या रिक्षाचालकाने केली. मात्र या दरम्यान पोलिसांनी ज्या ठिकाणी अपघात घडला त्या आसपासच्या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी या प्रकरणात जास्त काही शोध तपास न करता या उलट त्या रिक्षाचालकांना “तू त्या दुचाकीस्वाराला धडक मारली असती तर बरं झालं असतं. तर तक्रार दाखल करून घ्यायला सोपी पडली असती असा “विनोद” करणारा व अजब सल्ला दिला. एकीकडे पोलिसांचा ससे मिरा मागे नको व कोर्टाच्या फेऱ्या नको म्हणून या रिक्षा चालकाने या अपघाताची तक्रार देणे तूर्तास टाळले असले तरी अशा प्रकारच्या अपघातामध्ये पोलिसांनी रिक्षाचालकाला सल्ला देण्याऐवजी या दुचाकीचा शोध घेण्याची गरज होती. परंतु जास्त डोक्याला ताप न करता अजब सल्ला देत पोलिसांनी एक प्रकारे आपल्या कार्यपद्धतीचा”विनोद’ या निमित्ताने समोर आणला आहे. हा प्रश्न सर्व पोलिसांचा नाही तर ज्या पोलिस कर्मचाऱ्याने हा सल्ला दिला हा खरच कायद्याच्या चौकटीत हा सल्ला बसतो का? की अशा सल्ल्यातून त्या रिक्षाचालकाला अडचणीत आणण्याचा प्रकार पोलिसांना करायचा होता? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या रिक्षामध्ये अन्य कोणी प्रवासी असते व ते गंभीर जखमी झाले असते तर पोलीस यावेळी असा सल्ला देऊन गप्प बसले असते का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे याप्रकरणी कणकवली पोलीस निरीक्षक या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून यातील त्या दुचाकी स्वाराचा शोध घेत गणेश चतुर्थी च्या तोंडावर रिक्षा व्यवसाय बंद करून घरी बसण्याची वेळ आलेल्या अपघातग्रस्त रिक्षा चालकाला न्याय मिळवून देतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!