डॉक्टरांच्या अनुपस्थिती, राजीनाम्यांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण !

रुपेश पावसकरांनी वेधले लक्ष
“आरोग्य सेवा कधी सुरळीत होणार?” बैठकीत प्रशासनाला जाब
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांच्या अनुपस्थिती तसेच काही डॉक्टरांच्या राजीनाम्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी बैठकीदरम्यान उपस्थित केला. ग्रामीण भागातील नागरिक आणि महिला रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याने “आरोग्य यंत्रणा कधी सुरळीत होणार?” असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
बैठकीत डॉक्टरांच्या सातत्याने होणाऱ्या अनुपस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. डॉ. श्रीपाद पाटील आणि डॉ. वाळके यांच्या राजीनाम्याबाबत तसेच सेवा निवृत्ती (VRS) घेण्याच्या भूमिकेबाबतही चर्चा झाली. एखादा डॉक्टर रजेवर अथवा अनुपस्थित असल्यास त्याच्या जागी पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था का केली जात नाही, असा प्रश्न पावसकर यांनी उपस्थित केला.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी इतरत्र जावे लागत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विशेषतः महिला रुग्णांच्या अडचणी वाढत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
डॉक्टरांकडून राजीनामा अथवा रजेसाठी वैयक्तिक कारणे सांगितली जात असली, तरी त्यामागील अन्य कारणांचाही प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. डॉक्टरांची कमतरता आणि अनुपस्थिती यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळण्यासाठी डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करणे, अनुपस्थित डॉक्टरांच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे तसेच रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रुपेश पावसकर यांनी केली.






