दिनेश गोरे यांनी कवठीसह सिंधुदुर्गचे नाव दिल्लीत गाजवले : रुपेश पावसकर

कवठीतील पारंपरिक ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

गोरे दशावतार नाट्य मंडळाला दिल्ली येथे आपली कला सादर करण्याचा मान मिळणे ही कवठी गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. दिनेश गोरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून गावाचे नाव देशाच्या राजधानीत पोहोचवले, अशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी त्यांचे कौतुक केले.
कवठी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचा शुभारंभ रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
श्री. पावसकर म्हणाले की, कवठी ग्रामस्थ मंडळ विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. पारंपरिक नारळ लढविणे स्पर्धेच्या माध्यमातून जुन्या जाणत्या पिढीतील कलागुणांना वाव देतानाच गावची परंपरा आणि संस्कृती जपण्याचे काम होत आहे. अशा उपक्रमांमुळे गावातील एकोपा अधिक मजबूत होतो. भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवावेत; त्यासाठी आपल्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे यांनीही स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. नारळ लढविण्याची ही पारंपरिक स्पर्धा कवठी गावातून सुरू झाली असून भविष्यात तिचा नावलौकिक महाराष्ट्रभर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दिनेश गोरे आपली दशावताराची कला देशाच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार पोहोचवत असल्याचा आनंद असल्याचे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, भंडारी समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू गवंडे, सरपंच स्वाती करलकर, दिनेश गोरे, रुपेश वाड्येकर, रुपेश खडपकर, मंगेश बांदेकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष कवठकर, दादा करलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!