महाप्रितने कालबद्ध पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय इमारतीवर सौर उर्जा प्रकल्प राबवावा

मस्त्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
महाप्रितच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यामुळे विजेची आणि वीज बिलाची शासनाची बचत होणार आहे. मात्र महाप्रितने यासंदर्भात कालबद्ध आराखडा तयार करून लवकरात लवकर प्रकल्प कार्यान्वित करावेत, असे निर्देश मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. राणे बोलत होते. बैठकीला मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, व्यवस्थापक दीपक कोकाटे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तर दूरदृश्य प्रणालीद्वारे जि.प.चे अध्यक्ष प्रमोद कामत, सदस्य उपस्थित होते.
मंत्री श्री. राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा पावसाळी जिल्हा असल्याने येथील हवामानाचा सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक हवामानाचा अभ्यास करून, त्यानुसार तांत्रिक नियोजन आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करा. आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषदेसह, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, न्यायालय, शासकीय रूग्णालये, पंचायत समिती, पोलीस मुख्यालय, तहसील कार्यालय, ग्रुप ग्रामपंचायती आदी ठिकाणी सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. सर्व यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन अधिकारी यांना नोडल अधिकारी नेमण्यात यावे. एकाचवेळी सर्व ठिकाणी प्रकल्प सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेवटच्या टप्प्यात सामंजस्य करार करावेत, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी केल्या.






