कुडाळमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण

नोंदणीसाठी नगरपंचायतीचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या निर्देशानुसार कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील एकल महिलांची माहिती संकलित केली जाणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये एकल महिलेचे संपूर्ण नाव, प्रकार, वय, पत्ता, आधार क्रमांक, शिक्षण, उदरनिर्वाहाचे साधन, मासिक उत्पन्न, दिव्यांगत्वाची माहिती, कुटुंबातील सदस्यांची संख्या, दारिद्र्यरेषेखालील स्थिती, तसेच कुटुंबातील सदस्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो का, याबाबतची माहिती घेतली जाणार आहे.
कुडाळ शहरातील पात्र महिलांनी आपले नाव एकल महिलांच्या यादीत समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करावी. यादीत नाव आढळून न आल्यास संबंधित महिलेने दि. २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊन नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
एकल महिलांची अचूक माहिती शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने संबंधित महिलांनी सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






