जहाज बांधणी प्रकल्पासाठी मनसेकडून पालकामंत्र्यांचे अभिनंदन

प्रकल्पातील रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच उभारल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक ‘झोया मरीन प्रायव्हेट लिमिटेड’ या जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.
मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणपूरक जहाज बांधणी उद्योग प्रकल्प आणण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तसेच या प्रकल्पातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या रोजगारामध्ये जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींनाच प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणीही मनसेने केली आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याच्या कारणावरून स्थानिकांना डावलले जाऊ नये, यासाठी कंपनीने जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी विशेष स्किल ट्रेनिंग कार्यक्रम राबवावेत, असेही किनळेकर यांनी नमूद केले आहे.
या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच सिंधुदुर्गच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही गती मिळेल, असा विश्वास मनसेने व्यक्त केला आहे.






