कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील बंद सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू

आमदार निलेश राणे यांचे मार्गदर्शन
दर बुधवार व शनिवारी मिळणार सोनोग्राफीची सुविधा
जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे मागील काही काळापासून मनुष्यबळाअभावी बंद असलेली सोनोग्राफी सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महिला रुग्ण, गर्भवती महिला तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर बुधवार व शनिवारी सोनोग्राफीची सुविधा मिळणार आहे.
रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनही आवश्यक मनुष्यबळाअभावी ही सेवा बंद होती. परिणामी रुग्णांना सोनोग्राफीसाठी बाहेरील ठिकाणी जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन रुग्ण कल्याण समितीवरील आमदार प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याला यश आले असून सोनोग्राफी सेवेसाठी डॉ. राजेश उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता दर बुधवार आणि शनिवार दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात महिला रुग्णांसाठी स्त्रीरोग तपासणी व उपचार, प्रसूती, सिझेरियन, विविध आजारांची तपासणी व उपचार तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यांसारख्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू झाल्याने या सुविधांमध्ये आणखी भर पडली आहे.
“रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असताना केवळ सेवा बंद राहणे ही रुग्णांच्या दृष्टीने गंभीर बाब होती. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यामुळे आता डॉ. राजेश उबाळे यांच्या नियुक्तीने ही सेवा पुन्हा नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झाली आहे,” असे आमदार प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी सांगितले.
कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून यापुढेही सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.






