कलमठ ग्रामपंचायतचा’हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’चा संदेश

विधवा प्रथेला विरोध करणाऱ्या तृप्ती आशुतोष ठाकूर यांना ध्वजारोहणाचा मान
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ उत्साहात साजरा होत आहे. कलमठ ग्रामपंचायत दरवर्षी कलमठ गावातील विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या कलमठकरला सरपंच संदिप मेस्त्री ध्वजारोहणाचा मान देतात. गुणवंत विद्यार्थी, सफाई कर्मचारी यांना आज पर्यंत ध्वजारोहणाचा मान दिला आहे. आज पहिल्या दिवशीचा ध्वजरोहणाचा मान २० दिवसांपूर्वी पतीचे निधन झाले होते. अश्या कठीण प्रसंगी विधवा प्रथा न पाळता स्त्री सन्मान जपणाऱ्या कलमठ येथील तृप्ती आशुतोष ठाकूर यांना हर घर तिरंगा निमित्ताने कलमठ ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाचा पवित्र मान देऊन खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान केला आहे. यावेळी संदिप मेस्त्री बोलताना म्हणाले, कलमठ ग्रामपंचायत नेहमी ‘महिला स्नेही गाव’ म्हणून अनेक उपक्रम राबवत असून कलमठ ग्रामपंचायतने विधवा प्रथेला विरोधी ठराव घेत विधवा प्रथा न पाळणाऱ्या महिलांसाठी घरपट्टी माफ करण्याचा निर्णय केला होता. ‘ हर घर तिरंगा हर नारी सन्मान’ चा नारा देत त्याच ठरावासोबत राहून तृप्ती आशुतोष ठाकूर राहिल्याने त्यांचा सन्मान म्हणून ध्वजा रोहणाचा मान दिला असून ग्रामपंचायतीने महिला सन्मानाचा मंत्र दिला आहे अश्या महिलांच्या सोबत,पाठीशी आपला गाव कायम असेल असा संदेश आपण आजच्या दिवशी देत खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्य जपण्याचा प्रामाणिक हेतू असल्याचे सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले, मुख्याध्यापक मधुरा सावंत यांच्या हस्ते तृप्ती ठाकूर यांचा सन्मान कारण्यात आला.
यावेळी उपसरपंच रवींद्र यादव, मुख्याध्यापक मधुरा सावंत, सदस्य नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, इफत शेख, स्वाती नारकर, विद्या लोकरे उपस्थित होते.






