कुडाळच्या ‘नमो उद्याना’ची विभागीय समितीकडून तपासणी

कुडाळ नगरपंचायतीने उभारलेल्या ‘नमो उद्याना’ची विभागीय स्तरावरील समितीने बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी केली. शासनाच्या निर्देशानुसार उभारण्यात आलेल्या नमो उद्यानाच्या कामाची गुणवत्ता, सुविधा व निकषांची पूर्तता यांची यावेळी तपासणी करण्यात आली.
राज्य शासनाने ‘नमो उद्यान’ ही संकल्पना राबवित प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीस उद्यान उभारण्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जुलैअखेरपर्यंत ही उद्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कुडाळ नगरपंचायतीने सांगली परिसरातील खुल्या जागेत नमो उद्यान विकसित केले आहे.
या उद्यानाच्या तपासणीसाठी कोकण विभाग नगरपरिषद प्रशासनाचे विभागीय सहआयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त सागर घोलप, कार्यकारी अभियंता रूपाली पाटील, स्थापत्य अभियंता शशिकांत पवार, सिंधुदुर्ग नगर प्रशासनाचे आयुक्त विनायक औंधकर तसेच मुख्याधिकारी उपस्थित होते.
परीक्षण समितीचे स्वागत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केले. यावेळी गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका चांदणी कांबळी, मुख्याधिकारी खंडू पवळ, अभियंता सोनाली हळदणकर, लेखाधिकारी स्वप्निल पाटील, रसिका नाडकर्णी, श्री. नाटेकर यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
समितीने नमो उद्यानातील विविध सुविधा, विकासकामे व गुणवत्तेची सविस्तर पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व वेंगुर्ले येथील नमो उद्यानांची तपासणी करण्यात येत असून, कोकण विभागातील एकूण चार नगरपरिषदांच्या नमो उद्यानांची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

error: Content is protected !!