वेताळबांबर्डे येथील तो जीवघेणा खड्डा पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर तात्काळ बुजवला

माध्यमांमधून वृत्त प्रसारित झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ दिल्या होत्या सूचना
वेताळ बांबर्डे-पावशी सीमेवर मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या दिशेने जाताना मोठा खड्डा पडला होता. याबाबत माध्यमांमधून वृत्तप्रसारित होताच त्याची तातडीने पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेत महामार्ग प्राधिकरण विभागाला तातडीने सूचना दिल्या व त्यानंतर तातडीने हा खड्डा बुजवण्यात आला पालकमंत्र्यांची सतर्कता यानिमित्ताने दिसून आली असून याबद्दल जनसामान्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. हा खड्डा मोठा असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
वेताळ बांबर्डे ओव्हरब्रीज सोडल्यावर कुडाळच्या दिशेने जाताना हा खोलवर खड्डा पडला होता. आतील खडी बाहेर येऊन महामार्गावर पसरली होती. हा खड्डा वाहनचालकांना लांबून दिसत नव्हता. यामुळे वाहन खड्यात वाहने आपटून मोठी दुर्घटना घडू शकते. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने अपघात घडला होता. यामध्ये दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली होती. मुख्य म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ठेकेदाराने महामार्गावरील खड्डे बुजविले होते. त्या खड्डयांची स्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. महामार्गावरील खड्डयांचा प्रश्न गंभीर असून ठेकेदार तात्पुरती मलमपट्टी करीत आहे. अशा जीवघेण्या खड्डयांमुळे अपघात वाढण्याची शक्यता असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. पालकमंत्र्यांनी तात्काळ याबाबत दखल घेतल्याबद्दल त्यांच्या सतर्कतेबद्दल जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.






