रानभाज्यांच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना आरोग्य, पर्यावरण आणि परंपरेचे धडे

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचा उपक्रम कौतुकास्पद
बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “रानभाज्यांचे प्रदर्शन” या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, सौ. शेटे, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर तसेच शाळेच्या प्राचार्या चैताली बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
प्रमुख अतिथी ओमप्रकाश शेटे यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व, त्यांच्या नियमित आहारातील उपयोग आणि पर्यावरणाशी असलेले नाते याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी शाळेचे शिक्षक व प्राचार्यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे संशोधनवृत्ती, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि निसर्गाविषयी प्रेम विकसित होत असल्याचे सांगितले. प्राचार्या चैताली बांदेकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण अधिक प्रभावी ठरत असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांना पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध रानभाज्यांची ओळख करून देणे, त्यांच्या पौष्टिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच स्थानिक खाद्यसंस्कृतीचे महत्त्व पटवून देणे हा होता. विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे आकर्षक व माहितीपूर्ण प्रदर्शन मांडले होते. प्रत्येक रानभाजीची नावे, वैशिष्ट्ये, औषधी गुणधर्म, पौष्टिक मूल्ये आणि आरोग्यदायी फायदे यांची माहिती फलकांच्या माध्यमातून सादर करण्यात आली. तसेच रानभाज्यांपासून तयार केलेले विविध पारंपरिक व स्वादिष्ट पदार्थही प्रदर्शनात मांडण्यात आले होते. उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी केलेले प्रभावी सादरीकरण, रानभाज्यांविषयी दिलेली माहिती, पदार्थांचे आकर्षक मांडणी आणि पर्यावरणपूरक संदेश यामुळे संपूर्ण प्रदर्शन यशस्वी ठरले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराची सवय, जैवविविधतेचे संवर्धन आणि स्थानिक परंपरांबद्दल अभिमान निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे गेली अनेक वर्षे अशा प्रकारच्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग, आरोग्य आणि स्थानिक परंपरांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरत आहे.






