भात खरेदीचा जमा झालेला बोनस शेतकऱ्यांनी दलालांना देऊ नये!

कणकवली तालुका शिवसेनेचे तालुक्यातील भात विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आवाहन
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाबाबत वेधले कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष
कणकवली तालुक्यातील भात शेतकऱ्यांना मिळणारा बोनस काही ठिकाणी दलालांच्या घशात जात असल्याची बाब समोर आल्याने याबाबत शिवसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी व्ही. वाय. मुळे यांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांनी जर त्यांच्या बँक खात्यावर बोनस ची रक्कम जमा झाली तर ती दलालांना देऊ नये असे आवाहन शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना यावेळी करण्यात आले. तसेच याबाबत कृषी विभागाने देखील जनजागृती करावी अशी मागणी करण्यात आली. कणकवली तालुक्यातील कृषी विभागा संदर्भातील अनेक समस्याच्या अनुषंगाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने भात विक्री केलेले शेतकरी किती व किती किलो भात तालुक्यातून शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर दिले याची माहिती घेण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी मुळे यांनी 641 शेतकऱ्यांनी तालुक्यातून भात विक्री केली असून, 14, 219 किलो भात खरेदी झाल्याचे सांगितले. दलाल शेतकऱ्यांकडून सातबारा घेतात व त्यांच्या नावे भात विक्री केली जाते मात्र ज्यावेळी बोनस रक्कम शासनाने जाहीर केली त्यानंतर काही ठिकाणी तालुक्यामध्ये बोनसाची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी दलाला ना मिळाली असा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात तालुका कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा व दलालांच्या घशात रक्कम जाता नये शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे याकरिता कृषी सहाय्यकांना जनजागृती बाबत सूचना द्या अशी मागणी करण्यात आली. कणकवली तालुक्यात वनराई बंधाऱ्यांची कामे किती झाली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर 62 वनराई बंधारे झाल्याचे श्रीमती मुळे यांनी सांगितले. त्यावेळी श्री परूळेकर यांनी आम्हाला संपूर्ण झालेल्या बंधाऱ्यांच्या कामांची यादी द्या. जाग्यावर बंधारे झाले आहेत का? यांची खातरजमा करणार असल्याचे यावेळी सांगितले. ही यादी देण्याचे मुळे यांनी मान्य केले. एमआरजीएस अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली. मात्र वर्ष उलटून गेले तरी साहित्याचे किंवा बांबू खरेदीचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असल्याकडे उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत यांनी लक्ष वेधले. तर स्वयंचलित हवामान केंद्र कणकवली तालुक्यात वाढवा. व फोंडाघाट येथे असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राची जागा बदला या संदर्भातील प्रस्ताव शासन स्तरावर पाठवा शासनाकडून प्रस्तावना मंजुरी मिळून घेऊ अशी मागणी यावेळी करण्यात आली. जेणेकरून शेतकऱ्यांना अति पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचा फटका न बसता त्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य भरपाई मिळण्यास मदत होईल. असेही यावेळी सांगण्यात आले. तालुका कृषी विभागाच्या असलेल्या समस्या या येत्या महिन्याभरात सुटल्या पाहिजेत. तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यकांना गावभेटींना प्राधान्य द्यायला सांगा. व भात खरेदी च्या अनुषंगाने बोनस रक्कम दलालांच्या घशात जाता नये याकरिता काटेकोर काळजी घ्या व जनजागृती करा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत, शेखर राणे, दामू सावंत, बाबू आचरेकर, राजन म्हाडगुत, दीपक दळवी, मारुती सावंत, दीपक राऊत, भास्कर हडकर, यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली