उमेश गाळवणकर यांच्यावर सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या, अजातशत्रू, शैक्षणिक विकासाचे आयडॉल असलेले, दूरदृष्टी ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी नवनवीन कोर्सची एका छपराखाली सोय उपलब्ध करून देणारे बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा वारसा चालवणारे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था ज्यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे वाटचाल करीत आहे, असे बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गळवाणकर यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस पाच जून 2026 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला. सर्वस्तरातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
50 दीपप्रज्वलित करून त्यांचे सुवासिनींच्या शुभहस्ते औक्षण करण्यात आले. बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या आवारात बांधण्यात आलेल्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद घेणाऱ्या मुलांच्या पालकांकडून तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सर्व अभ्यासक्रमातील स्टाफ, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने व सर्व सामाजिक स्तरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिष्टचिंतन करून उमेश गाळवणकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध सामाजिक संस्था ज्ञातीबांधव, समाजातील मान्यवर व्यक्ती, हितचिंतक, मित्रपरिवार, विविध पक्षातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
माजी आमदार वैभव नाईक, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, अमित सामंत, प्रभाकर सावंत, धीरज परब, शेखर सामंत, मनीष दाभोलकर, प्रफुल्ल वालावलकर, नकुल पार्सेकर, राजू राऊळ, प्रा. अरुण मर्गज, अमृता गाळवणकर यांनी उमेश गाळवणकर यांना पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना, शिस्त दूरदृष्टी आणि माणुसकी यांचा सुरेख संगम असलेल्या व शिक्षणातून परिवर्तन हे ब्रीद कृतीतून सिद्ध करणाऱ्या उमेश गळवणकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. शून्यातून शैक्षणिक विश्व निर्माण करण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना त्यांचा सामाजिक उपक्रमातील सहभाग, शासकीय, सामाजिक सेवाभावी संस्थांना शिक्षण संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सहकारी वृत्तीचे, परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या दानशूर व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे गुणगान व कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक कार्य करतांना जिथे गरज असेल तिथे सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन उपस्थित मान्यवरांनी त्यांना दिले.
आपल्या सत्कार सोहळ्याला कृतज्ञ पूर्वक उत्तर देताना उमेश गाळवणकर यांनी आपला जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. लहानपणा पासूनचे हृदय हेलावून टाकणारे प्रसंग त्यांनी कथन करताना उपस्थितांची मने हिलावून गेली. रेल्वे हमाला पासून ते आजपर्यंतच्या आपल्या खडतर जीवन प्रवासाचा उपस्थितांना परिचय करून दिला. दिमाखात वाढदिवस साजरे करणे एवढे आपण मोठे नाही आणि प्रसिद्धीसाठी कधी काम केलं नाही. गरिबीतून आपण वर आलो; पण गरिबीची कधी आपण ढाल केली नाही. आपणही ती करू नये. असे सांगितले. जीवनाच्या वाटचालीत प्रतिकूल घटना वाईट प्रसंग हे सतत येत असतात. त्याने खचून न जाता नव्या उमेदीने त्यावर मात करण्यामध्ये खरा जीवनानंद आहे. ह्यालाच खरं जीवन असे नाव! असे सांगताना सामाजिक, शैक्षणिक काम करताना संघर्ष अडथळे अडचणी या येतच असतात. अश्यावेळी वाईटातून चांगल्या चा शोध घ्यावा. मिळालेल्या संधीचे सोने करावे. कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीवर आपण राजकारण न करता समाजसेवा केली. माणसासाठी माणूसपण जपलं आणि जातीभेदा पलीकडे जाऊन माणुसकी जपली. समाजासाठी संघर्ष केला. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे आम्ही शैक्षणिक कार्य योजलेली आहे ते प्रचंड सहनशीलता बाळगून करावयाचे आहे. त्यासाठी थकायचं नाही. थांबायचं नाही किंवा दूर पळायचे नाही. हा ठाम विश्वास व्यक्त करीत समाजासाठी सर्व काही सहन करण्याची परमेश्वराने आपल्याला शक्ती द्यावी. असे हे सामाजिक हिताचं शैक्षणिक काम करण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रेम आणि आपल्या सर्वांचे सहकार्य असेच निरंतर लाभो. अशी सदिच्छा व्यक्त केली. आई-वडिलांचा आशीर्वाद आणि सहचरणीची समर्थ साथ यामुळेच आपण इथपर्यंत मजल मारू शकलो. याचा आवर्जून उल्लेख केला.
आपल्या या सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल, व आपला अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केल्याबद्दल उपस्थितांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
सकाळच्या सत्रामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंदार जोशी यांनी केले तर संध्याकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित तेंडोलकर यांनी केले.
या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये उमेश गळवणकर यांच्या आई-वडिलांसहित, सासरे मेहुणे, परिवार, समाजातील विविध मान्यवर, रणजीत देसाई, प्रा डॉ. नंदिनी देशमुख, डॉ. गव्हाणकर, डॉक्टर रवींद्र जोशी, संजय वेंगुर्लेकर, सुनील बांदेकर, गजानन कांदळगावकर, रणजित देसा, मनोज वालावलकर, जि प शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जि प सदस्य रुपेश पावस्कर, विविध वृत्त समूहाचे पत्रकार, डॉ स्मिता सूरवसे, प्रसाद रेगे, अरुण दाभोलकर, शरद चव्हाण उभयता, डॉ. दीपाली काजरेकर, सुलभा देसाई, विठोबा सावंत, संदीप शिंदे, रणजित राणे, सौ. वालावलकर(वेतोरे हायस्कूलमाजी मुख्या.), हेमांगी नेवगी, डॉ. संजय निगुडकरी, सुनील भोगटे, मंदार शिरसाट, सुशील चिंदरकर, कुडाळ एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर उभायता, राजन नाईक, प्रसाद नाईक पिंगुळीचे सरपंच अजय आकेरकर, दशरथ राऊळ, नेरुरच्या सरपंच भक्ती घाडीगावकर, कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी व उमेश गाळवणकर प्रेमी, स्नेही उपस्थित होते. तर काहींनी दिवसभरामध्ये भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या
विशेष म्हणजे राजू कलिंगण यांच्या पुढाकाराने रात्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळ नेरुर यांनी उमेश गाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कामदेव गर्वहरण नावाचा बहारदार दशावतार नाट्य प्रयोगही सादर केला.





