माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस!

कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील मालमत्तांची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने माहिती मागवली
गेले काही दिवस थांबलेली कारवाई पुन्हा सुरू
कुडाळ मालवण चे माजी आमदार वैभव नाईक यांची पुन्हा एकदा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, या चौकशीच्या अनुषंगाने कणकवली शहरातील मालमत्तांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मागविण्यात आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान या चौकशी प्रकरणी वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने कागदपत्रे तपासणी केली जाणार असून गेले काही दिवस ही चौकशी थांबल्याचे चित्र असताना पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमीरा वैभव नाईक यांच्या पाठी लागला आहे. त्यामुळे वैभव नाईक यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कणकवली नगरपंचायत मधील वार्ड नंबर 1 मधील दोन मालमत्तांची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मागितली असून कणकवली नगरपंचायत ला याबाबतचा पत्रव्यवहार या विभागा कडून करण्यात आला आहे. यापूर्वी वैभव नाईक यांच्याकडून ज्यांनी सदनिका खरेदी केल्या होत्या त्यांची देखील माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागितली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वैभव नाईक यांच्या मागे सक्रिय झाला असल्याने वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी याबाबतचा नगरपंचायत ला पत्रव्यवहार केला आहे त्यामुळे आता वैभव नाईक यांच्यावर होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे.





