कलमठ मधील चिकन व्यावसायिकां कडील कचऱ्याचा प्रश्न कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी लावला मार्गी

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी नगराध्यक्षांची घेतली भेट

शहरालगतच्या कलमठ गाव हद्दीतील चिकन व्यावसायिकांचा कचऱ्याची नगरपंचायतीकडून विल्‍हेवाट लावली जावी अशी मागणी कलमठ ग्रामपंचायतीकडून आज करण्यात आली. तर नगरपंचायतीच्या कचरा डेपोत त्‍या कचऱ्याची विल्‍हेवाट लावली जाईल. मात्र कोणतेही प्रदुषण न करता हा कचरा कणकवली हद्दीत कलमठ ग्रामपंचायतीने आणून द्यावा असे नगराध्यक्ष श्री.पारकर यांनी स्पष्‍ट केले.
कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांच्यासह कलमठमधील प्रदीप सावंत, समीर कांबळी, किरण हुन्नरे, सचिन कुवळेकर आदींनी आज कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली. यावेळी कलमठ हद्दीत चिकन व्यावसायिकांकडील कचरा विल्‍हेवाट लावण्यासाठी जागा उपलब्‍ध नसल्‍याने नगरपंचायतीने हा कचरा आपल्‍या ताब्‍यात घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री म्‍हणाले की, कलमठ हद्दीतील कचरा डेपोसाठी जागा आहे. मात्र त्या डेपोपर्यंत जाण्यासाठी रस्त्याला स्थानिक जमीन मालकांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बिडयेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या जागेत कचरा संकलन आणि त्‍याची विल्‍हेवाट लावली जाते. मात्र ही जागा नागरी वस्तीमध्ये आहे. तेथे चिकन कचऱ्याची विल्‍हेवाट लावणे शक्‍य नाही. त्‍यामुळे चिकन व्यावसायिकांकडील कचरा नगरपंचायतीने ताब्‍यात घेऊन त्‍याची विल्‍हेवाट लावली जावी.
या मुद्दयावर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सहमती दर्शवली. ते म्‍हणाले, कचरा विल्‍हेवाट लावण्याबाबत येणारा खर्च आणि इतर बाबींची नगरपंचायत प्रशासनाकडून पूर्तता करून घ्यावी. तसेच कलमठ हद्दीमध्ये कणकवली नगरपंचायतीची कचरा संकलन गाडी जाणार नाही. तर कलमठ ग्रामपंचायतीने दररोज कलमठ हद्दीतील चिकन व्यावसायिकांकडील कचरा संकलन करावा. हा कचरा कणकवली हद्दीत आणून नगरपंचायतीच्या कचरा संकलन वाहना मध्ये द्यावा. मात्र हा कचरा आणताना रस्त्यामध्ये कोणतेही प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही निर्देश दिले.

error: Content is protected !!