कुडाळमध्ये २५ एप्रिलला विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन

‘चला कुडाळ घडवूया’ पर्व तिसरे अंतर्गत उपक्रम

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार

चला कुडाळ घडवूया…! पर्व तिसरे अंतर्गत कुडाळ येथे शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी शहर मर्यादित विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ मधील बॅ. नाथ पै विद्यालय (कुडाळेश्वरवाडी) च्या प्रांगणात हा कार्यक्रम सायं. ६.३० ते रात्री १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहीती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी कुडाळ येथे दिली.
नगरसेवक श्री. शिरसाट यांच्या पुढाकारातून चला घडवूया कुडाळ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबत आज श्री. शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत घेत तिसऱ्या पर्वाची माहीती दिली. ते म्हणाले, पहिल्या पर्वात आयएएस अधिकारी दत्तप्रसाद शिरसाट यांच्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला सुमारे दोनशे विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. दुसऱ्या पर्वात सेवानिवृत्त उपायुक्त गणेश दळवी यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाला अडीचशे विद्यार्थी उपस्थित होते. तसेच व्यापाऱ्यांसाठी जीएसटी कर प्रणालीबाबत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पर्व तिसरे अंतर्गत खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. नंतर पहिले स्लाईड शो सह व्याख्यान होईल. ओळख विश्वाची, आकाशगंगा, तारे, सूर्यमाला यांची ओळख तसेच भारत आणि जगभरातील खगोलशास्त्रीय संशोधनाचा परिचय याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येईल. खगोलशास्त्रात करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन होईल. नंतर लेझरसह रात्रीच्या आकाशाची ओळख, ग्रीन लेझरच्या सहाय्याने रात्रीच्या आकाशातील राशी, नक्षत्रे, तारे, ग्रह यांची ओळख तसेच
आठ इंच आणि सहा इंच व्यासाच्या टेलिस्कोपच्या सहाय्याने चंद्र, गुरू, शुक्र, क्लस्टर, नेब्युला यांचे दर्शन असा हा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कुडाळ शहर मर्यादित हा कार्यक्रम असून, विनाशुल्क कार्यक्रम आहे. मात्र विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. पुणे येथील खगोलशास्त्रात काम करणाऱ्या संस्थांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम होत आहे.
विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. शिरसाट यांनी केले आहे.
यावेळी संतोष वारखंडकर, संदीप महाडेश्वर, अमित राणे, हर्षद पाटील व विनय पालकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!