जिल्ह्याचा विकास करणे हे उपकार नव्हे, आमचे कर्तव्य! – आमदार निलेश राणे

निवजेतील उबाठाच्या सरपंच, उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
सिंधुदुर्ग जिल्ह्याने राणे कुटुंबीयांना मोठे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेची कामे करणे आणि जिल्ह्याचा विकास साधणे म्हणजे उपकार नव्हे, तर आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी निवजे येथे केले. निवजे ग्रामपंचायतीचे उबाठाचे सरपंच महेंद्र पिंगुळकर, उपसरपंच पूजा पालव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
निवजे येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, सभापती मिलिंद नाईक, तालुकाप्रमुख विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, रुपेश कानडे, पंचायत समिती सदस्य दिव्यांनी खरात, सौ. सावंत, मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, देवेंद्र नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, घावनाळे सरपंच दिनेश वारंग, निवजे शाखाप्रमुख सखाराम चव्हाण, राजू शेडगे, विलास पालव, अनिकेत तेंडोलकर, कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे, दिनेश शिंदे, पिंट्या राऊत, विजय जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांचे आमच्या कुटुंबात स्वागत आहे. तुम्ही ज्या विश्वासाने पक्षात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमची कोणतीही कामे अडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. जिल्ह्याचे राणे कुटुंबीयांवर मोठे उपकार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विकासकामांना मिळणारी मंजुरी हे युती सरकारचे श्रेय असल्याचे सांगत त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. माझी आज जी ओळख निर्माण झाली आहे, त्यामध्ये जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मोठे योगदान आहे. सोशल मीडियापेक्षा त्यांचे प्रत्यक्ष काम अधिक मोठे आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
कुडाळ एमआयडीसीला २४ तास वीज-पाणी पुरवठ्यासाठी ९० कोटींचा निधी
कुडाळ एमआयडीसीमध्ये उद्योगांना चोवीस तास वीज आणि पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. यासाठी सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, हा निधी देण्याचे त्यांनी मान्य केले आहे, अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.
रत्नागिरीमध्ये कोका-कोला कंपनीचे युनिट सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर कुडाळमध्येही उद्योग उभारला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मतदारसंघात रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यावर आपले विशेष लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी आतापर्यंत सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा निधी आणण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांत विकासकामांच्या बाबतीत निर्माण झालेली तूट भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आमदार राणे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.






