अमल ठाकूर यांच्या सुरेल गीतांनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत रंगली ‘स्वरसंध्या’!

भक्तिगीते, भावगीतांनी रसिक मंत्रमुग्ध

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला सुरेल मैफल

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वरसंध्या’ या संगीत कार्यक्रमात सिंधुदुर्गचे सुपुत्र, गायक व संगीतकार अमल ठाकूर यांच्या सुमधुर गीतांनी रसिकांना स्वरानंदाची अनुभूती दिली. कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिसरात रंगलेल्या या मैफलीत भक्तिगीते आणि भावगीतांच्या सुरेल सादरीकरणाने वातावरण भक्तिमय व प्रसन्न झाले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनावर आधारित भक्तिरसपूर्ण गीतरचना साकारलेल्या अमल ठाकूर यांनी आपल्या प्रभावी गायकीने रसिकांची मने जिंकली.
‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘हृदयाच्या तालावर’, ‘मुरलीधर शाम’, ‘घेई छंद मकरंद’, ‘माल्यगिरीच्या चंदन गंधित धूप तुला वाहिला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’, ‘अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘वृंदावनी वेणू वाजे’ आणि ‘काटा रुते कुणाला’ अशा एकापेक्षा एक सरस गीतांनी मैफलीत रंग भरला. परिचित गीतांचे सादरीकरण सुरू असताना रसिकांनीही उत्स्फूर्त दाद दिली.
सिंधुदुर्गचे आणखी एक सुपुत्र प्रसन्न प्रभूतेंडोलकर यांनी ‘शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले’ हे भावस्पर्शी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रजत गाळवणकर आणि सिद्धेश कुंटे यांनी तबल्याची, आदित्य आचरेकर यांनी हार्मोनियमची, तर मंदार जोशी यांनी ऑर्गनची साथ दिली. सुप्रसिद्ध गायक, कीर्तनकार व अभिनेते प्रशांत धोंड, तालरक्षक सुखी सामंत आणि राजन नाईक यांच्या उपस्थितीनेही कार्यक्रमाची रंगत वाढली.
म्हापणचे सुपुत्र रामकृष्ण ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रफुल्ल वालावलकर यांच्या रसपूर्ण आणि प्रसंगोचित निवेदनाने कार्यक्रमात अधिक रंगत आणली. अमल ठाकूर यांच्या सुरेल गायकीने आणि वादकांच्या उत्कृष्ट साथीने ‘स्वरसंध्या’ ही स्वरमैफल शारदीय चांदण्यांच्या साक्षीने संस्मरणीय ठरली.
या कार्यक्रमाला उमेश गाळवणकर, राजन नाईक, प्रदीप बर्डे, प्रफुल्ल वालावलकर, रणजीत देसाई, मनोज वालावलकर, सुंदर गाळवणकर, सुनील सौदागर, सचिन कुडतरकर यांच्यासह अनेक संगीतप्रेमी रसिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रणव प्रभू, श्रीकृष्ण सामंत, गौरव खानोलकर, स्वानंद सामंत, प्रसाद नाईक, अमित तेंडोलकर आणि रवी प्रभू यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आयोजित या सुरेल मैफलीचा आनंद घेतलेल्या रसिकांनी आयोजकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. भक्तिगीते आणि भावगीतांच्या सुरेल आविष्काराने सजलेली ही ‘स्वरसंध्या’ उपस्थितांच्या स्मरणात राहणारी ठरली.

error: Content is protected !!