महिला पोलीस स्मिता माने यांच्या मृत्यू प्रकरणी पती पोलीस सचिन मानेवर गुन्हा दाखल

स्मिता माने मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

कुडाळ पोलिसांकडे तपास वर्ग

कणकवली पोलीस ठाण्याच्या हवालदार स्मिता माने यांचा मृतदेह बिगवाडी – हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत रविवारी दुपारच्या सुमारास आढळून आला होता. दरम्यान सद्यस्थितीत ही आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी स्मिता यांची बहीण सौ. रेश्मा रवींद्र जाधव (रा. उंबरठ – पिंपळवाडी) यांनी स्मिता यांचे पती तथा कणकवली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सचिन माने यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. सचिन यांनी शारीरिक, मानसिक त्रास दिल्याने स्मिता यांनी कंटाळून गळफास घेतला असावा किंवा सचिन यांनीच स्मिता यांचा घातपात केला असावा, असे स्मिता यांची बहीण रेशमा यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे. त्यानुसार सचिन माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून स्मिता माने मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवालदार स्मिता माने दोन दिवसापासून बेपत्ता होत्या. याबाबत त्यांचे पती तथा कणकवली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सचिन माने यांनी स्मिता माने बेपत्ता असल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दिली. तर रविवारी दुपारच्या सुमारास बिडवाडी हुंबरणे येथील एका काजू बागेत स्मिता माने यांचा मृतदेह झाडाच्या फांदीला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्मिता यांच्या माहेरच्या मंडळींनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. स्मिता यांचा पती सचिन माने हा सातत्याने स्मिता यांना त्रास देत होता. तो स्मिता यांचा शारीरिक छळ करायचा, असे माहेरच्यांनी कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांना सांगितले. त्यानंतर स्मिता यांची बहीण रेश्मा जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार सचिन माने यांनीच स्मिता बेपत्ता असल्याचे रेश्मा यांना कळवले. त्यानंतर रेश्मा या सचिन याच्या राहत्या घरी गेल्या असतात घरातील फरशीवर मोठ्या प्रमाणात लांब केस पडलेले दिसले. अर्थातच स्मिता यांना मारहाण झाली आहे, असे रेश्मा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्मिता यांचा मुलगा सार्थक याला विचारले असता सचिन यांनी स्मिता यांना रात्री पट्ट्याने मारहाण केली होती. त्यानंतर स्मिता बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्या होत्या, अशी माहिती सार्थक यांनी दिली, असे स्मिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे तर सचिन हे स्मिता यांचा कायमच शारीरिक, मानसिक छळ करायचे. त्यालाच कंटाळून स्मिता यांनी आत्महत्या केली असावी किंवा सचिन यांनीच घातपात केला असावा, असेही रेश्मा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सचिन माने यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!