आचऱ्याच्या चौघड्यावरच्या गणपती बाप्पाचे अप्रतिम पेन्सिल स्केच

अथर्व तावडेच्या कलेला देवस्थान समितीकडून दाद!

भक्ती आणि कलेचा अनोखा संगम; देवस्थान समितीकडून अथर्वचा सन्मान

आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या मंदिरात सुरू असलेल्या ४१ दिवसांच्या गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात चिंदर गावठणवाडी येथील कु. अथर्व गणेश तावडे याने आपल्या कुंचल्याऐवजी पेन्सिलच्या माध्यमातून साकारलेल्या चौघड्यावरच्या गणपती बाप्पाच्या अप्रतिम रेखाचित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अथर्वच्या या कलाकृतीतून त्याची कलात्मक दृष्टी, कल्पकता आणि गणरायाप्रती असलेली भक्ती यांचा सुंदर प्रत्यय येत असून त्याच्या या कलागुणांचे परिसरातून कौतुक होत आहे.
अथर्वने अत्यंत कल्पकतेने साकारलेले हे पेन्सिल स्केच इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी संस्थानचे वहिवाटदार महादेव मिराशी, देवस्थानचे सचिव संतोष मिराशी आणि पत्रकार परेश सावंत उपस्थित होते. या प्रसंगी देवस्थान समितीच्या वतीने अथर्वचा सत्कार करून त्याच्या कलागुणांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कु. अथर्व तावडे हा ज्युनिअर कॉलेज, आचरा येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून त्याला चित्रकलेची विशेष आवड आहे. शिक्षणासोबतच कलेची जोपासना करणाऱ्या अथर्वने आपल्या कलाकृतीतून चौघड्यावरच्या गणपती बाप्पाचे रूप रेखाटत भक्तीला कलात्मक अभिव्यक्तीची जोड दिली आहे. त्याचे हे स्केच म्हणजे श्रद्धा, कल्पकता आणि कलासाधना यांचा सुरेख मिलाफ ठरला आहे.
विशेष म्हणजे, अंमली पदार्थविरोधी जनजागृती भित्तिपत्रक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या हस्ते अथर्वचा गौरव करण्यात आला होता. या यशानंतर आता धार्मिक आणि कलात्मक क्षेत्रातील त्याच्या योगदानाचीही दखल घेतली जात आहे.
अथर्वच्या या कलाप्रवासाला मिळालेली ही कौतुकाची थाप त्याला भविष्यात आणखी उत्तम कलाकृती साकारण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. त्याच्या या कलागुणांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!