राज्यस्तरीय नवउद्योजिका पुरस्कारप्राप्त मृणाल सावंतचा कुडाळ येथे गौरव

नृत्यांगना ते नवउद्योजिका! मृणाल सावंतचा प्रेरणादायी प्रवास

वयाच्या दहाव्या वर्षापासून नृत्यकलेची साधना करत यशाची शिखरे गाठणाऱ्या मृणाल सावंत हिने नृत्यांगना ते नवउद्योजिका असा प्रेरणादायी प्रवास केला आहे. कला क्षेत्रातील यशानंतर व्यवसाय क्षेत्रातही तिने घेतलेली गरुडझेप कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष डॉ. संजय सावंत यांनी केले.
पिंगुळी येथील सिंधुरत्न प्रबोधिनी आणि कुडाळ-पिंगुळी येथील गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटर यांच्या वतीने मृणाल सावंत हिला नाशिक येथे नुकताच राज्यस्तरीय नवउद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल तिचा डॉ. संजय सावंत, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी अनुप्रिया जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. संजय सावंत म्हणाले की, मृणाल हिने गेल्या १४ वर्षांत नृत्य क्षेत्रात मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यानंतर व्यवसाय क्षेत्रातही वाटचाल सुरू करून अवघ्या दोन वर्षांत नवउद्योजिका पुरस्कार मिळवणे, ही तिच्या मेहनतीची आणि कार्याची पोचपावती आहे.
सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी अनुप्रिया जाधव यांनी मृणालने कला आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत प्रामाणिकपणे काम करत मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मृणाल सावंत म्हणाली की, गेल्या १४ वर्षांच्या नृत्यप्रवासात अनेकदा सत्कार झाले; मात्र आपल्या कार्याची दखल घेऊन जाधव कुटुंबीयांकडून झालेला सत्कार हा विशेष महत्त्वाचा आहे. आपल्या यशामागे उपस्थितांचे आशीर्वाद आणि प्रोत्साहन असल्याचे सांगत, कलेच्या क्षेत्रात मिळणारी शाबासकीची थाप ही पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारी असल्याचे तिने नमूद केले.
प्रास्ताविकात हेमंत जाधव यांनी मृणाल सावंत हिच्या गेल्या १४ वर्षांतील नृत्यकलेच्या प्रवासासह व्यवसाय क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी गिअर अपचे संचालक साईराज जाधव, प्रतीक्षा सावंत, पूजा जाधव, डॉ. सुविधा वाळवे, पूजा नाडकर्णी, दर्शन मयेकर, अनिकेत सावंत, योगेश घाडी, काजल जावकर, जयंत रेगे, ओंकार शिरसाठ, विनोद पिंगुळकर, निश्चय मसगे, कुणाल करनूरकर, ओंकार सावंत, राघव जाधव आदी उपस्थित होते. आभार साईराज जाधव यांनी मानले.

error: Content is protected !!